पंचवटी : नातेवाईक असलेल्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून कुरापत काढून मखमलाबाद रोडवर जाणता राजा कॉलनीत एका बंगल्याच्या आवारात अनधिकृत प्रवेश करत चौघा संशयितांनी दुचाकी, स्कूलव्हॅन तोडफोड करून बंगल्याच्या खिडकीच्या काचा फोडल्याची घटना रविवारी रात्री (दि.१४) उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडफोड प्रकरणी जाणता राजा कॉलनीत राहणाऱ्या संतोष पवार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून काठे गल्ली येथे राहणारे संशयित मनोज सुरेश बागडे, संतोष भगवान कहार, वरद संतोष कहार, (रा. शिवाजी चौक, कथडा), अनिल खंडू जेजुरकर, (रा. सिंहस्थनगर, नवीन नाशिक) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री पवार कुटुंबीय झोपलेले असताना नातेवाईक असलेल्या संशयितांनी पवार यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. जोरजोराने आरडाओरड करत शिवीगाळ सुरू करून गोंधळ घातला. एका नातेवाईक महिलेबरोबर प्रेमसंबंध असून गेल्या दोन महिन्यांपासून महिला बेपत्ता आहे. महिलेला कुठेतरी लपवून ठेवले या कारणावरून कुरापत काढून लोखंडी रॉडने संशयितांनी बंगल्याच्या आवारातील दुचाकी, स्कूल व्हॅनची तोडफोड केली. तसेच बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले. बेकायदा बंगल्यात प्रवेश करत वाहनांची तोडफोड करून काचा फोडल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.