कळवण : कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकानेच लाखो रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असताना संशयित गोकुळ चव्हाण यांनी हा अपहार केल्याचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी तक्रारीत म्हटले आहे. चव्हाण हे शाळेत प्रभारी मुख्याध्यापक असताना त्यांनी विद्यार्थी लाभाची सुवर्ण महोत्सवी योजनेची १ लाख ९६ रुपयांची रक्कम, शालेय पोषण आहाराची २७ हजारांची रक्कम, समग्र शिक्षा अभियान योजनेची २० हजार रुपयांची रक्कम अशी एकूण २ लाख ४३ हजारांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ऑक्टोबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२१ पर्यंत हा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे करीत आहेत.