दत्ता दिघोळे -
नाशिक - सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी ( दि.२८ ) रात्री घडली. जखमी अवस्थेत पाठलाग करणाऱ्या बिबट्याच्या तावडीतून मजूर बालंबाल बचावल्याने कुटूंबाने सुटकेचा निश्वास सोडला. येथिल दिगंबर कातकाडे वस्तीजवळ राहणारे विष्णू बाळासाहेब तुपे (२५) (बेलु ता.सिन्नर ) हे शनिवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गावात बाजार आणण्यासाठी मोटारसायकलवर निघाले होते, तेव्हा ही घटना घडली.
गंगाघाटाच्या रस्त्यावरून जात असतांना तुपे यांना समोरच्या ऊसात मांजराच्या डोळ्यांसारखे चमकल्याने तुपे यांना शंका आल्याने ते थांबले तेवढ्यात समोरच्या दिशेने बिबट्याने त्यांच्या अंगावर झाप मारून हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तुपे जमिनीवर पडले.त्यांच्या हाताला,पायाला व मानेवर दातांनी जखमा झाल्या आहे.येवढ्यात उभी असलेली मोटारसायकल जमिनीवर पडल्याने तुपे बिबट्याच्या तावडीतून सुटले. या झटापटीत बिबट्या थोडा अंतरावर असल्याचे पाहून जखमी विष्णू तुपे याने आपल्या घराकडे पळ काढला.बिबट्याने पुन्हा पाठलाग सुरू केला मात्र थोड्याच अंतरावर घर असल्याने उजेडात गेलेल्या तुपेचा पाठलाग सोडून बिबट्याने पुन्हा शेजारच्या उसात पलायन केले.जखमी अवस्थेत तुपे यांनी बिबट्याच्या हल्ल्याला धिराने परतून लावले तसेच घाबरलेल्या अवस्थेतही त्यांनी घराकडे पळ काढल्यामुळे ते बालंबाल बचावले.हा संपूर्ण प्रकार कुटूंबातील सदस्यांना समजताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान घडलेला प्रकार शेजारच्या राम दिगंबर कातकाडे यांना समजल्यावर त्यांनी घडलेला प्रकार वनविभागाला कळवत तुपे यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.येथिल प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिक येथिल सिव्हिल मध्ये दाखल केले आहे.