सिन्नर : तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला गेला. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यास रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी (दि. २७) बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांसह वनविभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
आठ दिवसांपूर्वी फुलेनगर(माळवाडी) शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याच्या आत बिबट्याने विहिरीतून चढाई करून पळ काढला होता. त्यानंतर बिबट्याने वसंत पठाडे यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शुक्रवारी पहाटे पठाडे यांच्या शेतातील पिंजऱ्यात बिबट्या अडकला. मंगळवारी पहाटे फुलेनगर (माळवाडी) शिवारात वसंत रभाजी पठाडे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून त्यास जखमी केले होते. त्यानंतर या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्या दिसून येत होता. शुक्रवारी पहाटे पिंजऱ्यात बिबट्या अडकला. घटनेची माहिती सिन्नर वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने बिबट्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. सदर बिबट्या हा नर जातीचा आहे.
चौकट-
तोच बिबट्या आहे काय?
गेल्या आठवड्यात फुलेनगर शिवारातील दत्तात्रय आनप व सुरेश माळी यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. तथापि, बिबट्याने विहिरीतून स्वत: चढाई करून उसात धूम ठोकली होती. त्यानंतर सदर बिबट्या अनेक ठिकाणी दिसला होता. अखेर शुक्रवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या विहिरीत पडलेला बिबट्याचा असण्याची अंदाज आहे. तथापि, काही शेतकऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्या व आता पिंजऱ्यात जेरबंद असलेला बिबट्या वेगवेगळे असल्याचे म्हटले आहे.
चौकट-
आगीतून विहिरीत आणि नंतर पिंजऱ्यात
ऊस पेटल्यानंतर पळालेला बिबट्या विहिरीत पडल्याचे सांगितले जाते. वनविभागाचे कर्मचारी येण्याच्या आत बिबट्याने स्वत: ६० फूट खोल विहिरीतून चढाई करून धूम ठोकली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यानंतर विभागाने चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला गेला. त्यामुळे हाच तो बिबट्या असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहींच्या मते अजून एक बिबट्या या परिसरात वावरत आहे.