दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा राहिल्याने परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.करंजवण धरणातून जवळपास एक महिन्यापासून पालखेड जलाशयात पाण्याचे आवर्तन चालू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तरी हे चालू असलेले पाणी आवर्तन त्वरित बंद करण्यात यावे अशी स्थानिक शेतकरी वर्गाने मागणी केली आहे. जर हे पाणी असेच चालू राहिले तर एप्रिल व मे महिन्यात दिंडोरी तालुक्यातील बळीराजांवर पाणीटंचाईची संक्रांत निर्माण होईल असे भाकीत व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात करंजवण धरण प्रथमच शंभर टक्के भरले होते. त्यामुळे परिसरातील बळीराजांवर आता पाणीटंचाईचे संकट कोसळणार नाही असे बोलले जात होते. परंतु सध्या गेल्या एक महिन्यापासून निफाड, येवला येथे हे पाण्याचे आवर्तन चालू असून धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे.यंदा दिंडोरी तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जर धरणातील पाणी साठा कमी होत गेला तर तालुक्यातील नागरिकांना व शेतकरी वर्गाला मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे बोलले जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात करंजवण धरणांतून मोठ्या प्रमाणावर पालखेड धरणांत पाणी सोडण्यात येत असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात कादवा नदीचे पात्र पाण्याविना उपाशी राहाते. परिणामी कादवा काठच्या गावांना नागरिकांना, जनावरांना, शेतकरी वर्गाला पाणीटंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो. पाणी आवर्तन सोडतांना सलग असू नये. त्यामध्ये काही प्रमाणात अंतर असावे अशी ही मागणी जोर धरीत आहे.धरणांची पाणीसाठा टक्केवारी याप्रमाणे:१) पालखेड :- ६४ %२)ओझरखेड:- ५७%३)तिसगाव :-४८%४)करंजवण :-३६%५)पुणेगाव :-३५%६)वाघाड :-२४%
(१८ दिंडोरी डॅम)