नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर गावात राहणाऱ्या जावरे कुटुंबीयांचा अल्पवयीन मुलगा अचानकपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याची तक्रार नांदेडच्या कुंटुर पोलीस ठाण्यात दिली होती. तेथून रेल्वे पोलिसांनी सर्व जिल्ह्यांतील रेल्वे पोलिसांना ‘अलर्ट’ करत त्या अल्पवयीन मुलाच्या वर्णनाची माहिती कळविली. यानंतर नाशिक रोड पोलिसांनी रेल्वेगाड्यांची कसून झडती सुरू केली. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी आपल्या पथकासमवेत नांदेडहून येणाऱ्या प्रत्येक एक्स्प्रेस गाड्यांच्या बोगी तपासण्यास प्रारंभ केला. त्या अल्पवयीन मुलाचे छायाचित्र स्थानिक रेल्वे पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करण्यात आले. या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला.
दरम्यान, तपोवन एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी नाशिक रोडच्या फलाट क्रमांक तीनवर आली असता पोलीस विजय कपिले यांनी गाडी तपासली. एका डब्यातून प्रवाशांसोबत लहान मुले उतरली. त्यातील एक मुलगा चेहरा लपवून चालला होता. त्यामुळे त्यांनी त्यास हटकले असता त्याने नातेवाईक स्थानकाबाहेर असल्याची माहिती दिली. या मुलाला नाव विचारल्यावर त्याने फक्त नागेश असे नाव सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यास विश्वासात घेत येथील चौकीत आणले. पोलिसांनी नांदेडच्या कुंटुर पोलिसांना माहिती कळविली. यानंतर त्या अल्पवयीन मुलाचे वडील नाशिक रोडला आले व त्यांनी रेल्वे पोलिसांकडून आपल्या मुलाचा ताबा पुन्हा घेतला.
‘...अन् म्हणे मित्राला भेटण्यासाठी आलो’
‘मी माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी नाशिकला आलो आहे, तो दोन महिन्यांपूर्वीच नांदेडहून नाशिकला आला होता,’ अशी काही तरी गोष्ट सांगितली. पोलिसांनी तपास केला असता त्याचा करण नावाचा कुठलाही मित्र नाशिकमध्ये आलेला नाही, हे निष्पन्न झाले. हा मुलगा खोटे बोलत होता आणि पबजी गेम खेळत तो रेल्वेतून नाशिकला पोहोचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तिकीट मिळाले नाही; तर लपून प्रवास
या अल्पवयीन मुलाकडे त्याने साठवलेले ५५० रुपये होते. त्यातून त्याने राहेर ते नरसी आणि नरसी ते नांदेड असा प्रवास केला. नांदेड रेल्वे स्थानकावर पाेहोचल्यानंतर त्याला तिकीट मिळाले नाही; त्यामुळे त्याने तपोवन एक्स्प्रेस गाठली. या एक्स्प्रेसमधून तो लपत-छपत प्रवास करत थेट नाशिक रोडपर्यंत येऊन पोहोचला. पोलिसांनी त्याला रेल्वे प्रवासात लहान मुलांना असलेल्या धोक्यांबाबतची जाणीव करून दिली. यानंतर त्याने मोठे होऊन चांगला माणूस व्हायचे आहे आणि शिक्षण पूर्ण करणार असल्याचे सांगितले.