अजित पवार जो निर्णय घेतील तो कोकाटे, नितीन पवार, सरोज आहेर यांना मान्य; राजकारण ढवळले
By Suyog.joshi | Published: April 18, 2023 01:48 PM2023-04-18T13:48:40+5:302023-04-18T13:49:00+5:30
झिरवाळ जपान दौऱ्यावर, भुजबळ आजारी असल्याने संपर्क नाही
नाशिक : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. अजित पवार यांनी २०१९ ला देखील पहाटे- पहाटे भाजपा सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेऊन अख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का दिला होता. त्यानंतर पुन्हा आता ते भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरत असून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण सात आमदार आहेत. त्याबाबत नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट शब्दात मांडल्या आहेत.
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे व कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवार जो निर्णय घेतील, त्यासोबत राहू असे सांगितले तर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य राहिल असे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे हेविवेट नेते माजी मंत्री व येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ आजारी असून त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही, ते मुंबईत आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ हे जपान दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
पक्ष वाढविण्यासाठी कोणीही प्रयत्न करते. महाराष्ट्रात ज्यांची ताकद आहे त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल. भाजपही असे करीत असेल तर त्यात काही वावगे नाही. तथापि, भाजप प्रवेशाबाबत अजित पवार यांच्यासोबत काहीही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य वाटत नाही. दादांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या हवेतील आहेत. प्रत्यक्ष घटना घडेल तेव्हा निर्णय घेऊ. त्यामुळे अजितदादा भाजपत जाणार का? यावर भाष्य करणे योग्य नाही. आपण अजित पवार यांच्या साेबत आहोत, ते जे निर्णय घेतील त्यांच्या भूमिकेशी सहमत राहू. - माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार जी भूमिका घेतील, त्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू, आम्ही त्यांच्यासोबत राहू. अजून आमच्याशी अजित पवार, आमचे नेते शरद पवार यांनी कोणीही संपर्क साधलेला नाही. अजित पवार हे महत्त्वाचे नेते आहेत. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे असते. ते भाजपात जाणार नाही, परंतु असा काही निर्णय झालाच तर आम्ही दादांसाेबत राहू. मला मागील टर्ममध्ये उमेदवारी देतांना दादांची महत्त्वाची भूमिका होती. दादा उपमुख्यमंत्री असतांना माझ्या मतदारसंघात सुमारे ३०० कोटींची विकासकामे झाली होती. दादांबरोबर आम्ही आहोत. -नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा
सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मला प्रसारमाध्यमांकडून याबाबत कळाले. राज्यात सध्या अजित पवार हे भाजपा बरोबर जातील अशी चर्चा आहे मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृतपणे माहिती ही आमच्यापर्यंत आलेली नाही. त्या संदर्भात मी बोलणे उचित नाही आणि जेव्हा असे होईल तेव्हा पक्ष नेते जो निर्णय घेईल त्यासोबत असणार आहे. सध्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू असल्याने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालू आहे आणि रात्री घरी आल्यावर उशिरा टीव्ही बघितल्यावर ऐकायला मिळाले. त्यात अजित पवार यांनी सांगितले की, मी कोणालाही बोलवले नाही, फोन केलेला नाही. या संदर्भात पक्षाचा निरोपही नाही. -दिलीप बनकर, आमदार, निफाड
अजित पवार जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. - सरोज आहेर, देवळाली मतदार संघ
हे आहेत नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रावादीचे आमदार
१) छगन भुजबळ : येवला
२) नरहरी झिरवाळ : दिंडोरी
४) नितीन पवार : कळवण
५) माणिकराव कोकाटे : सिन्नर
६) दिलीप बनकर : निफाड
७) सरोज आहेर : देवळाली