नाशिक : पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले.
विश्वकर्मा पब्लिकेशनच्यावतीने प्रकाशित आणि तेंब्रे परिवाराच्यावतीने आयोजित वि. अ. तेंब्रे लिखित आपध्दर्म या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ चित्रकार पंडितराव सोनवणी, ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत, प्रकाशन संस्थेचे संदीप तापकीर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाेलताना अकोलकर यांनी वि. अ. तेंब्रे यांच्या काळातील आठवणींना उजाळा देतानाच पत्रकाराने तटस्थ असायला हवे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना नरहरी भागवत यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत तेंब्रे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पत्रकारितेत घडलो, असे ते म्हणाले. पंडितराव सोनवणी यांनी तेंब्रे यांच्या कथेसाठी लागणाऱ्या चित्रांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आपध्दर्म या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेंब्रे परिवाराच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होेते.