मनमाड : इंधन कंपन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर जागेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या रेल्वे साइडिंग व व्हॅगन गॅटरी ( रेल्वे टॅंकर्स लोडिंग-अनलोडिंग)चा प्रस्तावित प्रकल्प आहे. त्यासाठीच्या जागा मोजणीसाठी नांदगाव येथून आलेल्या भूसंपादन तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी प्रखर विरोध करीत पळवून लावले.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील जमिनीचा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकऱ्या व इतर मागण्यांसंदर्भात जोपर्यंत लेखी करार होत नाही, तोपर्यंत आम्ही जमीन मोजणीस विरोध करणार असल्याची भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. तसेच भूमापन कार्यालयामार्फत व कंपनीतर्फे ज्यांची जमीन मोजणी सुरू करण्यात आली, त्यांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना देण्यात आली नाही. जबरदस्तीने मोजणी सुरू करण्यास आमचा विरोध व हरकत आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जमीन द्यायची नाही, असे निवेदन यावेळी ग्रामस्थांनी दिले. त्यामुळे मंगळवारी पानेवाडीत आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना व नांदगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
यावेळी पानेवाडी येथील शेतजमिनी मालकांपैकी वाल्मीक रघुनाथ आहिरे, संजय वाळूबा सांगळे, गोकुळ दादा सांगळे, प्रेमराज दादा सांगळे, दत्तू मोहन सांगळे, रामनाथ दत्तू सांगळे, काळू मोहन सांगळे, दत्तू उत्तम वाघ, दत्तू अशोक काकड, दगडूबाई वाघ आदींसह महिला उपस्थित होत्या. एचपीसीएलचे अधिकारी अनिल मेश्राम, किरण मैत्र, भूमापन अधिकारी एन. जी. आहिरे, जे. के. शेख, मनमाडचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी. बी. गिते, उपनिरीक्षक गौतम तायडे आदींसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
इन्फो :
२४ वर्षांपूर्वी पानेवाडीलगत इंधन साठवणूक प्रकल्प उभा करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची एच.पी.सी.एल. कंपनीने फसवणूक केली. दिलेले आश्वासन पाळले नाही . त्यामुळे या कंपनीवर आमचा विश्वास नसल्याची बाजू यावेळी जमीनमालक शेतकऱ्यांनी मांडली.
फोटो(३१ मनमाड आंदोलन) : शेतकरी आणि इंधन कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावताना पोलीस अधिकारी.