पंचवटी : सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत कोयत्याने केक कापू नका असे सांगूनही पोलिसांना न जुमानता कायदा हातात घेत कोयत्याने केक कापणाऱ्या विधी संघर्षित बालक डीजे मालक आणि डीजे ऑपरेटर यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतधाम येथील खैरे मळ्यात बुधवारी (दि.९) रात्री सव्वादहा वाजता काही युवक डीजे साउंड लावत कोयत्याने केक कापत असल्याचे पोलीस गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ नाचणाऱ्या व कोयत्याने केक कापणाऱ्या युवकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. मात्र विधी संघर्षित बालकासह त्याच्यासमवेत असलेल्या अन्य युवकांनी पोलिसांचे काही एक न ऐकता कोयत्याने केक कापून शांतता भंग करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र डीजे साउंड मालक तसेच विधी संघर्षित बालकासह त्याचे साथीदार पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी रवींद्र मनोहर शिरसाठ, प्रशांत चरणदास राठोड, डीजे ऑपरेटर गौरव अरुण नारायणे, डीजे मालक आकाश सुरेश वाघ व इतर तिघांवर गुन्हा दाखल करून शिरसाठ, नारायणे आणि राठोड या तिघांना अटक केली. तसेच पोलिसांनी डीजे साउंड ताब्यात घेतला आहे.