नाशिक : लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेल्या एका पोलिस शिपायाने त्र्यंबकेश्वरच्यातहसीलदार असलेल्या श्वेता संचेती यांच्या मानेला हिसका देत, सुमारे दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा व गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत, सोनसाखळी चोर संशयित पोलिस योगेश शंकर लोंढे यास बेड्या ठाेकल्या आहेत.
जिल्हाधिकारी निवासस्थानामागील जेजुरकर कॉलनीच्या जवळील रस्त्याने किराणा माल खरेदी करून, पायी जाणाऱ्या संचेती यांच्यावर पाळत ठेवत दुचाकी घेऊन उभे असलेल्या दोघांपैकी एकाने पायी चालत त्यांच्याजवळ येऊन सोनसाखळी ओढली. रविवारी (दि.१२) लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी ही घटना घडली होती. सोनसाखळी चोराने पुढे पाळत जाऊन दुचाकीवर बसून धूम ठोकली होती. एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने संशयित लोंढे याने साेनसाखळी चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संचेती यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तपासाला गती देण्यात आली. या गुन्ह्यातील संशयित लोंढे हा अंबड भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी साथीदार व लोंढे यांच्यात मतभेद होऊन वाद झाले होते. हा वाद चांगलाच वाढला आणि अल्पवयीन साथीदाराने घडलेला प्रकाराची सगळी माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविली होती. यामुळे पोलिस लोंढेच्या मागावर होते. चौकशीत तो पोलिस शिपाई असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच वर्षांपूर्वी ‘एसीबी’च्या जाळ्यातसंशयित लोंढे हा २०१२ साली १५ हजारांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. खातेनिहाय चौकशीअंती पोलिस आयुक्तालयाकडून त्याचे निलंबन करण्यात आले होते. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो जनरल ड्युटी करत होता, असे सूत्रांनी सांगितले.