नाशिक : येथील फैज मर्कन्टाईल को-ऑप. बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून चौघा संचालकांची पदे रद्द करण्यात आल्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी केली आहे. त्यामुळे बँकेच्या विद्यमान सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे. हाजी सलीमबेग जब्बारबेग मिर्झा, शेख रफतजहॉ शकील, डॉ. शेख सादीक खलीक व तडवी आरीफ इब्राहीम अशी चौघा संचालकांची नावे असून आहेत.
फैज बँकेच्या आर्थिक गैरव्यहाराबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली असता, त्यात तथ्य आढळून आल्याने अधिक चौकशीसाठी ८८ अन्वये संचालकांना नोटिसा बजावून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. यात संचालकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असता, उपरोक्त चौघे संचालक आपली बाजू मांडण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांकडे हजर राहिले नसल्यामुळे त्यांचे काही म्हणणे नसल्याचे समजून उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी चौघांचे संचालकपद रद्द ठरविले आहे.