नाशिक : मुळ अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी-शिर्डी रस्त्यावरील दंडवते वस्तीवरील रहिवासी असलेल्या उच्चशिक्षित नोकरदार युवकाने नाशिकच्या एका हॉटेलमध्ये स्वत:ला पेटवून घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१४) उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहाता तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात मेंटनेन्स इंजिनिअर म्हणून नोकरी करणारे तौसिफ हबीब पठाण (३५,रा. दंडवते वस्ती, ता. राहाता) याने नैराश्यातून नाशिकच्या मुंबई नाका भागातील एका हॉटेलमध्ये स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. पठाण हा मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये आला होता. त्याने मंगळवारी (दि.१२) येथील हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती. त्यानंतर बुधवारी (दि. १३) त्याने चेकआउट केले ; मात्र तो पुन्हा संध्याकाळी हॉटेलमध्ये वास्तव्यास आला. रात्रीचे जेवण व मद्यप्राशन केल्यानंतर तो झोपला. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याच्या खोलीतून धूर व आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझविली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पलंगावर संपूर्णत: जळालेल्या अवस्थेत पठाण आढळून आला. पोलिसांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात त्याने मृत्यूपूर्व लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत त्याने केवळ ‘ मै तुम्हारे लिये कुछ नहीं कर सका....’ एवढेच वाक्य लिहिलेले असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांनी सांगितले. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती कळविली. पठाण याचा भाऊ अकरम हबीब पठाण याच्या ताब्यात मृतदेह सोपविला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले असा परिवार आहे.