नाशिक : शहर व परिसरात दुधाला मागील दोन दिवसांपासून मागणी अधिक वाढली आहे. तसेच, रमजान पर्व हे महिनाभरापासून सुरू होते. यामुळेही नागरिकांकडून एरवीपेक्षा जास्त दुधाची खरेदी केेली जात होती. यामुळे रमजानकाळात दुधाचे दर किरकोळ बाजारात प्रति लिटर १० रुपयांनी वाढले. रमजान ईद गुरुवारी (दि.११) साजरी केली जाणार असल्याने पूर्वसंध्येला बुधवारी (दि.१०) बाजारात दूध अधिक ‘तापले.’
शहरातील जुने नाशिकमधील शहीद अब्दुल हमीद चौकात भरणारा दूध बाजार, तसेच वडाळारोड, वडाळागाव, पखालरोड या भागात दूध विक्रीची खासगी दुकाने आहेत. वडाळा गावात असलेल्या गोठ्यांमधूनसुद्धा दुधाची किरकोळी विक्री काउंटरवरून केली जाते. रमजान अगोदर दुधाची ७० ते ७५ रुपये प्रति लिटर दुधाची विक्री होत होती. उन्हाळा तीव्र होताच दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली. ताक, लस्सी, श्रीखंड, बासुंदी, आइस्क्रीम पार्लरमध्ये दुधाची मागणी होऊ लागली. तसेच, महिनाभरापूर्वी रमजान पर्वालाही प्रारंभ झाला होता. यामुळे दुधाची मागणी दुप्पट झाली. परिणामी रमजानकाळात शहरासह उपनगरांत दूध प्रतिलिटर ८० ते ८५ रुपये दराने विक्री केले गेले. संपूर्ण महिनाभर हे दर स्थिर राहिले होते; मात्र मंगळवारपासून (दि.९) दुधाचे दर पुन्हा अस्थिर झाले. दूध बाजारासह किरकोळ दुधाची विक्री काउंटरवरूनसुद्धा प्रतिलिटर ९० रुपये प्रमाणे दुधाची विक्री होत होती. बुधवारी दूध बाजारात दुधाचा भाव संध्याकाळी १००रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊन पोहोचला होता.
दूध खरेदीसाठी रांगा
रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बुधवारी शहरातील जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव भागात दूध खरेदीसाठी दूध विक्रीच्या दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे दुधाचा पुरवठाही कमी पडला. सर्वांना दूध मिळावे, यासाठी काही दूध विक्रेत्यांनी प्रति व्यक्ती १ लिटर इतकीच दूध विक्रीसुद्धा केल्याचे चित्र वडाळागावात पाहावयास मिळाले.
शिरखुर्म्याच्या गोडव्याला महागाईचा तडका
तीव्र उन्हाळा, चाराटंचाई आणि दुधाला वाढलेली मागणी यामुळे पुरवठा कमी पडू लागला आहे. मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा अपुरा पडत असल्याने दूध बाजारात दर गडगडले. सणासुदीचा काळात दुधाची मागणी दुप्पट झाली. तसेच, यंदा खोबरे वगळता सर्व प्रकारच्या सुकामेव्याचे दर भडकले आहेत. चारोळी, किसमिस, खारीक, पिस्ता, काजू, बदाम हा सर्व सुकामेवा महागला आहे. यामुळे यंदा ईदच्या शिरखुर्म्याच्या गोडव्याला महागाईचा तडका मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त केली जात आहे.