लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीचे मंदिर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली. गडावरील नवरोत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून, सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजामुळे दीड महिना मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून, २६ सप्टेंबरपासून म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करणार आहे.
सहा ते आठ सप्टेंबर या तीन दिवसात श्री क्षेत्र काशी येथील धर्मशास्त्र पारंगत पंडित गणेश्वर शास्त्री, द्रविड नाशिक येथील शांताराम शास्त्री भानुसे, सप्तशृंगगड येथील पुरोहित, संघाच्या मार्गदर्शनाखाली भगवती मंदिरात सहस्त्रकलश, महास्नपन विधी, संप्रोक्षण विधी, उदक शांती, शांती होम आदी धार्मिक पूजा विधींचे आयोजन महाराष्ट्रातील तज्ज्ञ पुरोहितांकडून करण्यात येणार आहे संपूर्ण पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान तसेच ज्योत पेटून घेऊन जाणाऱ्या भाविकांसाठी पहिल्या पायरी येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.
मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग कवच हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केले आहे. त्यानंतर पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्र पूर्वी होणार आहे. २६ सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले.
ललित निकम,विश्वस्त, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट.