नाशिक : कोरोनाने संपूर्ण विश्वालाच हादरवले असले तरी कला आणि नाट्यक्षेत्रावर तर अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनापूर्व, कोरोनाकाळ आणि नुकताच सुरू होत असलेल्या कोरोनोत्तर काळातील नाट्यक्षेत्रातील आव्हानांचा पट उलगडत लॉकडाऊनमधील मानसिकतेचे वास्तववादी सादरीकरण ‘हा वास कुठून येतोय?’ नाटकातून करण्यात आले.
कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये कलावंंतांची मन:स्थिती आणि हतबलता अधोरेखित करण्यात लेखक प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यशस्वी ठरले. शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील अखेरचे नाटक सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेच्या वतीने हा वास कुठून येतोय ? या नाटकातून करण्यात आले. नाटकाच्या इतिहासात कोरोनापूर्व आणि कोरोनात्तर अशी मांडणी होण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर नाट्यक्षेत्र आणि त्यांच्या समस्या बदलल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये नाटक बंद असल्याने अनेक कलावंत नाटकापासून दुरावले. अनेक कलावंतांनी उपजीविकेचे साधन नसल्याने नवीन छोटे मोठे व्यवसाय उभारले तर अनलॉकनंतरही कलावंतांच्या समस्या संपल्या नाहीत. ५० टक्के क्षमतेने सुरू असणारे नाट्यगृह, कोरोनाकाळात दुरावलेले रसिक यांना परत नाटकाकडे वळविण्याचे मोठे आव्हान नाट्यकर्मी समोर उभे राहिले आहे. हा विषय नाटकातून मांडण्यात आला आहे. कलावंतांच्या अंतरंगाचे दर्शन हा वास कुठून येतोय ? या नाटकातून घडले. प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत रोहित सरोदे, श्रीनाथ म्हात्रे, तेजस जोशी, नेपथ्य लक्ष्मण कोकणे, चेतन बर्वे, शेखर सरोदे, वेशभूषा कविता देसाई, रंगभूषा माणिक काकडे यांच्यासह धनंजय गोसावी, नीलेश सूर्यवंशी, प्रवीण कुलकर्णी, क्षमा देशपांडे, श्रद्धा पाटील, प्रांजल सोनवणे, सुयश गायकवाड, सोनाली काळे, साहील चंद्रमोरे, अरवी गिरासे, प्राजक्त गांगुर्डे, निहाल शेख, शुभम लांडगे या कलाकारांनी अभिनयातून विषय सक्षमपणे पोहोचवला. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा या नाटकाने समारोप झाला. नाटकात प्राथमिक फेरीत अनेक दर्जेदार आणि वास्तववादी विषय हाताळण्यात आले आहेत. त्यामुळे स्पर्धा चुरशीची झाल्याने आता कलावंतांना आणि रसिकांना स्पर्धेच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.