शैलेश कर्पे
सिन्नर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती मार्गावर रविवारी सायकल स्पर्धांचा थरार पाहायला मिळाला. देशातील ३२ राज्यांतील १ हजाराहून अधिक स्पर्धक या सायकल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेगाशी स्पर्धा करणाऱ्या महागड्या सायकली समृद्धी महामार्गाच्या सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर सुसाट वेगाने धावताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने २७ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सकाळी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी हरीश बैजल व माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गोव्यासह ३२ राज्यांतील ५०० मुली व ५०० मुले, असे १ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय सायकलपटू ठरले आकर्षण
सिन्नर तालुक्यातील पाथरेपासून सोनारीपर्यंत ५० किलोमीटर अंतराचा मार्ग पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या मार्गावर राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा ७ ते १० जानेवारीदरम्यान होत आहेत. यात पूजा धनावळे, मयुरी लुटे, विवान सप्रू यांच्यासारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्पर्धकांचा सहभाग आहे.