नाशिक : आदिवासी समाजाची संस्कृती सोडून दुसऱ्या धर्मात धर्मांतरीत होणाऱ्यांना आदिवासी समाज म्हणून आरक्षण मिळणे ही भोळ्या आदिवासी बांधवांची फसवणूक आहे. धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षणाचा दुहेरी लाभ देणे आदिवासींना मान्य नसून १२ कोटी आदिवासी बांधवांची वज्रमूठच धर्मांतरीतांच्या दुहेरी आरक्षणाचा लाभ रोखेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री खासदार डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला. महामेळाव्याआधी आदिवासी समाज बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने गोल्फ क्लब मैदानावर डीलिस्टींग महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ब्रिटीश काळापासून आदिवासी संस्कृतीवर, बांधवांवर अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले. आमच्या समाजाचा इतिहास हा माता शबरीच्या रुपाने रामायणात चिरंतन आहे. मात्र, काही समाजव्देष्टे आम्ही रावणाला देव मानतो सांगत दिशाभूल करीत आहेत.
आमच्या समाजाला कुणीही चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही. आमच्या समाजाने हजारो वर्ष या देशाच्या जल, जंगल, जमीनीचे संरक्षण केले असून आमचा समाज हा निसर्गपूजक असल्याचेही त्यांनी नमूद केले. जे अन्य धर्मात गेले, त्यांना आदिवासी म्हणून आरक्षण घेण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यामुळे अशा धर्मांतरीतांना आरक्षणच नको तसेच धर्मांतराच्या अपप्रचारालाही रोखण्याचे आवाहन पवार यांनी केले.