नाशिक : पहिल्या दिवसापासूनच विविध कारणांमुळे राज्यात चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील ट्विस्ट वाढतच असून, महायुतीत असतानाही पक्षाची अधिकृत उमेदवारी देत युतीच्या अजित पवार यांनी पक्षाचा एबी फॉर्म देत उमेदवार उभा केला खरा; मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी थेट प्रतिपक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्याने महायुतीमधील कुस्ती वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे.
नाशिक विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या नाशिक विभागात दररोज काही ना काही नवे वळण लागते आहे. नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराच्या कथित अपहरणनाट्यानंतर अजित पवार गटाच्या उमेदवारीमुळे महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती त्यातून धडा घेईल, असे बोलले जात असताना नेमके त्याच्या विपरीत चित्र मतदारसंघात दिसून येते आहे. असे असताना अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनीच या निवडणुकीकडे फिरवलेली पाठ चर्चेला खतपाणी देणारी ठरली.
याच दरम्यान छगन भुजबळ यांचे वक्तव्य आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे असतानाही त्यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराला दिलेला कथित आशीर्वाद पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारा ठरला. त्यामुळे एकतर महायुतीत अजित पवार गटाच्या भूमिकेवर संशय आणि त्यातही राष्ट्रवादीमध्येच सुरू असलेली सुंदोपसुंदी यामुळे महायुतीच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
बोगस मतदार असल्याचा आरोप
जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक मतदार म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शिक्षणाशी संबंध नसलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून, अशा शेकडो मतदारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असा आरोप अपक्ष आमदार विवेक कोल्हे यांनी केला आहे. यादीत नाव असलेल्या मतदारांच्या नावांची छाननी सुरू आहे. शिक्षक मतदारांच्या थेट घरापर्यंत जाऊन याबाबत खातरजमा करण्यात येत असून, लवकरच त्याबाबत तक्रार नोंदविणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.