संजय पाठक, नाशिक- मुंबई पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असूनही नाशिकची आयटी पार्क बाबतीत उपेक्षा होत होती मात्र आता नाशिक शहराजवळ राजुर बहुला येथे नियोजित औद्योगिक वसाहतीत 100 एकर जागेत आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल उद्योग मंत्रालयाच्या समितीची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला. नाशिकमध्ये आयटी पार्क व्हावा यासाठी उद्योजकांकडून सातत्याने मागणी होत होती तसेच राजकीय नेत्यांकडूनही पाठपुरावा केला जात होता. मध्यंतरी नाशिक महापालिकेने आडगाव जवळील सुमारे 300 एकर खाजगी जागेमध्ये खाजगीकरणातून आयटी पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता मात्र राज्यातील राजकीय घडामोडी नंतर तो मागे पडला. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी राजूर बहूला या ठिकाणी आय टी पार्क व्हावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. अखेरीस शासनाने राजुर बहुला येथे शंभर एकर क्षेत्रात आयटी पार्क विकसित करण्यात येईल त्यासाठी ही जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, राजूर बहुला परिसरात शंभर एकर जागेत होणार आयटी पार्क
By संजय पाठक | Published: October 18, 2023 12:06 PM