संजय शहाणे
नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस पंपावर मागील चार दिवसांपासून डिझेल इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे १३ पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांचे दोन्ही युनिट आदींची गस्ती पथकाच्या वाहनांना ‘ब्रेक’ लागला आहे. सलग सुट्ट्यांचा मोठा वीकेण्ड आल्यामुळे इंधनसाठा संपल्याचे कारण आयुक्तालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दोन दिवसांत इंधन तुटवड्याची समस्या मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापुर, पंचवटी ,आडगाव, म्हसरूळ, अंबड, इंदिरानगर, सातपूर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्पसह सायबर पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या प्रत्येक पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना स्वतंत्र वाहन व गस्ती पथकासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुन्हे शोध पथकासाठी एक स्वतंत्र वाहन आहे. ही वाहने जीप प्रकारातील असून ती डीझेलवर चालतात.
गंगापुररोडवरील पोलिसांच्या सद्भावना पेट्रोल पंपावर सलग सुट्ट्यांमुळे डीझेल चणचण भासू लागली. यामुळे पोलिसांच्या या वाहनांची चाके फिरणार कशी? अशी समस्या भेडसावू लागली आहे. यावर नाशिक शहर पोलिसांकडून ग्रामिण पोलिसांची मदत घेत तात्पुरता तोडगा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या घटनांमध्ये एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे इंधनाअभावी पोलिसांच्या वाहनांची चाके थांबू लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
‘रिस्पॉन्स टाइम’ कसा घटणार..?
गुन्हा ज्या ठिकाणी घडतोय, किंवा घडला आहे, त्याठिकाणी सरासरी वेळेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. रिस्पॉन्स टाइम कमीत कमी असावा, असे पोलिसांना सांगितले जाते; मात्र एकीकडे वाहनांना इंधनाची चणचण भासत असेल तर मग हा रिस्पॉन्स टाइम घटण्याऐवजी तो वाढणार हेच निश्चित...!