सटाणा, जि. नाशिक (नितीन बोरसे) : सोशल मीडियावर बनावट खाते सुरू करून त्यावर पतीच्या कुटुंबातील लोकांचे फोटो व अश्लील व्हिडीओ अपलोड करून ठेंगोडा येथील एका तरुणास पत्नीनेच फसवल्याची तक्रार सटाणा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, ठेंगोडा येथील ३४ वर्षीय उच्चशिक्षित छोटू हरी सोनवणे याचा विवाह ठाणे येथील अरुणा मधुकर थोरात हिच्याशी झाला.
सहा महिने संसार गुण्यागोविंदाने सुरू असतानाच आपण मुंबईला राहायला जाऊ, असा प्रस्ताव पत्नीने दिला. हा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे पती-पत्नीत शाब्दिक खटके उडाले. त्यामुळे पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. वारंवार निरोप देऊनही नांदावयास न येता तिने पतीविरुद्ध काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार देत त्या बदल्यात २० लाख रुपये देऊन घटस्फोट घ्या, अशी मागणी वारंवार करू लागली.
घटस्फोटाच्या मागणीस छोटूने नकार देताच पत्नीने छोटूच्या नावाने इन्स्टाग्रामला बनावट खाते सुरू केले. त्यावर छोटूच्या कुटुंबातील लोकांचे फोटो व अश्लील व्हिडीओ अपलोड केले. त्यातच छोटू सोनवणे याचे ठेंगोडा निधन झाल्याचा फोटोही टाकला. नातेवाईक व मित्रांकडून याबाबत छोटूच्या कुटुंबीयांकडे विचारणा झाली असता हे अकाउंट बनावट असल्याचे समोर आले. संबंधित मोबाइलची पडताळणी केली तेव्हा तो अरुणाचा असल्याचे सिद्ध झाले. त्यावरून छोटूने पत्नी अरुणा थोरात ऊर्फ करुणा संतोष अहिरे हिच्या विरुद्ध सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.