चाडेगाव : जुन्या वीजनिर्मिती संचांमधून वीजनिर्मिती करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्या तरी त्यावर मात करून नाशिक औष्णिक वीज केंद्र देशात विसाव्या क्रमांकावर आहे. तर केंद्रातील संच क्रमांक ५ हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती संचलन निरीक्षण संघाच्या बैठकीत देण्यात आली.एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात ५१वी संचलन पुनर्निरीक्षण संघाची बैठक पार पडली. यावेळी वीजनिर्मितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चासत्रात नितीन गगे, अधीक्षक अभियंता यांना एकलहरा औष्णिक विद्युत केंद्राच्या कामगिरीचा आढावा सादर केला. एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र ३५ वर्षे जुन्या संचातून वीजनिर्मिती करताना अनेकवेळा आलेल्या तत्कालिक कठीण प्रसंगावर मात करून देशात २०व्या क्रमांकावर आहे. तसेच वीजनिर्मिती केंद्रातील संच क्र. ५ हे राज्यात पहिल्या स्थानावर आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१५ या काळात १७५.३६ कोटींचा नफा मिळवला आहे. भारांकात ७१.१० टक्के वरून ८७.९८ पर्यंत व वीजनिर्मितीत ३०८० दशलक्ष युनिट वरून ३३२४.८५ दशलक्ष युनिटपर्यंत वाढ झाली असूनही मागील वर्षीच्या तुलनेत इंधन तेल वापरात ३३ कोटींची बचत केली. तसेच वीजनिर्मिती जास्त करून कोळसा वापरात १३.८७ कोटी रुपयांची बचत केली आहे. याशिवाय संच संचलनाकरिता विजेचा वापर ५.७ टक्के कमी केल्यामुळे सुमारे २५.९८ कोटी रुपयांची बचत केली. तसेच फ्लाय अॅशचा वापर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असून, पाण्याचा पुनर्वापर ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे ही महानिर्मिती कंपनीत एकलहरे विद्युत केंद्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरत आहे. यावेळी दर महिन्याला विद्युत केंद्रात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार हा अंबादास नामदेव मुसळे यांना मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या हस्ते देण्यात आला. बैठकीला महानिर्मितीचे संचलन संचालक, विजय सिंह, कार्यकारी संचालक कैलास चिरूटकर, एनटीपीएसचे परिंदा, उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारे, गजेंद्र पुराणिक, अधीक्षक अभियंता व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)
औष्णिक केंद्राचा संच क्रमांक ५ प्रथम स्थानावर
By admin | Published: January 17, 2016 10:29 PM