नाशिक : शहरालगत असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील दाेन कारखान्यांमध्ये चाेरी झाल्याची घटना समोर आली असून, यातील पहिली घटना ३० एप्रिलला सातपूर वसाहतीत तर दुसरी घटना २ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही चोऱ्यांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असून यात रोख रकमेसह कारखान्याच्या काही खुल्या सामानाचाही समावेश आहे. याप्रकरणी सातपूर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली असून या प्रकरणात घटनेत दीपक नथू पाटील (रा. अयोध्या कॉलनी, पाथर्डी रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंटेक्स कंट्रोल्स कारखान्याचे काम बघत असताना ३० एप्रिल रोजी चोरट्यांनी कारखान्यात प्रवेश करीत ऑफिसमधील ड्रॉवरमधून १४ हजारांची गेटबार्टल व अन्य साहित्य, रोकड, मोबाईल असा ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाली असून सातपूर पोलीस ठाण्यातील हवालदार चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तर दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील बंपर इंडिया प्रा.लि कारखान्यात १ मे रोजी घडली. याप्रकरणी श्रीनिवास सांगलीकर (रा. चार्वाक चौक, इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कामगार
दिनानिमित्त कारखाना बंद असताना चोरट्यांनी कारखान्याच्या कंपाैंडची जाळी कापून ६५ हजार रुपये किमतीचे सेमीफिनीश व कच्चा माल चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.