त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये शुक्रवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे शटर व दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. मात्र रक्कम हाती न लागल्याने त्यांनी बँकेचे तीन सीपीयु व फुटेज हाती लागु नये म्हणून सीसीटिव्हीचे राऊटर असा ५९ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे.त्र्यंबकेश्वर मंदिर रस्त्यावर पंचायत समिती कार्यालयासमोर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शुक्रवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेचे पुर्व बाजुकडील शटर वाकवले व त्यामागील लाकडी दरवाजा तोडुन आतमध्ये प्रवेश केला. शाखाधिकारी यांच्या केबिनची उचकापाचक केली. तसेच त्यांची महत्वाची कागदपत्रे असलेली तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.चोरट्यांना रक्कम ठेवण्याची जागा सापडलीच नाही. निराशेपोटी त्यांनी तिन संगणकाचे ४४ हजार रुपये किमतीचे ३ सीपीयु, १ टिबी व ५०० जीबीची हार्ड डिस्क स, २२ इंचचा एक मॉनिटर, पाच हजार किमतीचे ॲटो डायलर, आठ हजार किमतीचा सीसीटिव्ही राउटर, दोन हजार किंमतीचा दोन मेगा पिक्सलचा सीसीटिव्ही कॅमेरा असे ५९ हजाराचे साहित्य चोरुन नेले.सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान शिपाई बँक उघडण्यासाठी आला असता, सदर प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने त्वरीत वरीष्ठांना माहिती कळविली. वरीष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केरीत श्वान पथकाला पाचारण केले. पोलिस हवालदार संजय उगले, पोलिस नाईक विठ्ठल बोरसे, पंकज तेजाळे आदिंनी नाशिक ग्रामीण पथकातील श्वान टॉमी सह चोरांचा माग काढला असता शंभर ते दीडशे फुटावरील स्मशानभुमी पुलाजवळील झाडाच्या पारापर्यंत माग दाखवला. तेथुन पुढे चोर वाहनाने पसार झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ठसेतज्ञांना आणण्यात आले असता त्यांना काही ठिकाणचे ठसे मिळविण्यात यश आले. या कारणास्तव बँकेचे शनिवारी व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.बँकेचे शाखाधिकारी विवेक द्विवेदी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक सचिन पाटील, पोलीस उप अधिक्षक भिमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस नाईक प्रदीप भाबड व सहकारी अधिक तपास करीत आहेत.संगणकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत असा चोरुन नेलेल्या वस्तूंवरुन अंदाज घेतला जात आहे. तरी देखील सीसीटीव्हीवरील फुटेज व पोलीस डॉगने दाखवलेल्या मार्गाचा अभ्यास करता संशयीत आरोपीपर्यंत लवकरच पोहचु असा आम्हाला विश्वास आहे.- भिमाशंकर ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी.
स्टेट बँकेचे शटर तोडून चोरी; ५९ हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 7:32 PM
त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये शुक्रवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे शटर व दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. मात्र रक्कम हाती न लागल्याने त्यांनी बँकेचे तीन सीपीयु व फुटेज हाती लागु नये म्हणून सीसीटिव्हीचे राऊटर असा ५९ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे.
ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : रक्कम सुरक्षित, तिजोरी उघडण्याचा प्रयत्न