नाशिक : कुणाला वृत्तवाहिन्यांचा प्रतिनिधी असल्याचे सांगत, तर कुणाला महापालिकेच्या वैद्यकीय-आरोग्य विभागाचे कर्मचारी असल्याचे भासवत तपासणीच्या नावाखाली बोगस ठरवत डॉक्टरांकडून खंडणी उकळण्याचा प्रकार एका डॉक्टरानेच उघडकीस आणला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. माकपचे गटनेते अॅड. तानाजी जायभावे आणि नगरसेवक सचिन भोर यांच्यासह डॉक्टरांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लागलीच दोघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांना थेट महापालिकेत आणले असता दोघा संशयितांनी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांच्या सांगण्यावरूनच सदर प्रकार केल्याची कबुली माध्यमांसमोर बोलताना दिली. वैद्यकीय अधीक्षकांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, दोघा संशयितांकडून अनेक डॉक्टर लुबाडले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पालिकेचा वैद्यकीय विभागही संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अंबड-सातपूर लिंकरोडवरील केवलपार्क येथे साई क्लिनिक चालविणारे डॉ. अमोल वाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजेच्या दरम्यान तीन व्यक्ती साई क्लिनिकमध्ये आल्या आणि आम्ही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे कर्मचारी असून, आम्हाला अधिकृत डिग्री व नोंदणी प्रमाणपत्र तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णांना बाहेर जाण्यास सांगून ‘तुम्ही बोगस डॉक्टर आहे’ असे म्हणत मोठ्या रकमेची मागणी केली. पैसे न दिल्यास वृत्तवाहिनी व वर्तमानपत्रातून तुमची बदनामी करू, असेही धमकावले. धमकावणाऱ्याने त्याचे नाव घनदाट असे सांगितले. त्याचवेळी त्याने पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनाही फोन लावून बोगस डॉक्टर पकडल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत व्हिडिओ कॅमेराही होता. याबाबत वाजे यांनी नगरसेवक सचिन भोर यांना दूरध्वनीवरून घनदाट नावाचा कुणी कर्मचारी आहे काय, याची विचारणा केली; परंतु तसा कोणीही कर्मचारी नसल्याचे भोर यांनी खात्री करून सांगितले आणि तेथेच दोघा संशयितांचे बिंग फुटले. डॉ. वाजे यांनी तत्काळ डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशीही संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वजण डॉ. वाजे यांच्या क्लिनिककडे रवाना झाले. खंडणी वसूल करणारे भारत घनदाट आणि रवि कावते (दोघेही राहणार जुने सिडको) यांना ताब्यात घेऊन माकपचे गटनेते अॅड. तानाजी जायभावे, नगरसेवक सचिन भोर आणि डॉक्टरांच्या संघटनांचे पदाधिकारी महापालिकेत आले. जायभावे यांनी संबंधित प्रकाराबाबत तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांनाही पाचारण केले.
डॉक्टरांना लुबाडण्याचा प्रकार उघड दोघे ताब्यात, नंतर फरार : पालिका कर्मचारी असल्याचे सांगत खंडणी वसुली; वैद्यकीय अधीक्षकांवर आरोप
By admin | Published: December 23, 2014 12:29 AM