पाथरे येथील सतीश चांगदेव चिने यांचे कृषीपंप, एकनाथ सोपान दवंगे यांचे कृषीपंप स्टार्टर, योगेश दवंगे यांचे सहाशे फूट केबल, भाऊराव चिने यांचे ऑटोस्विच आदी शेतीसंबंधित साहित्य चोरीस गेल्याने सदर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जवळपास पंधरा हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जोमात आलेल्या पिकांना शेतकरी पाणी पुरवठा करीत आहेत. अशातच विजेचे साहित्य चोरीस गेल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे विजेचा लपंडाव तर दुसरीकडे चोऱ्या यामुळे शेतकरी पेचात सापडला आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बिबट्या व दोन बछडे पाहिले होते. त्यामुळे रात्री- अपरात्री शेतकरी पिकांना पाणी देण्यास घाबरत होते. याच काळाचा चोरांनी फायदा घेऊन चोरी केल्याचा अंदाज आहे. या चोरीसंदर्भात वावी पोलीस ठाणे येथे संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यावर चौकशी करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केले आहे. या घटनेचा वेळीच तपास न लावल्यास असे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाथरे येथे शेतातील साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:49 AM