ट्रक घाटात कोसळून दोघे जण जखमी
सिन्नर : तालुक्यातील गोंदे येथून निघालेला ट्रक घाटातील शेवटच्या वळणावर कठड्यावर आदळून १५ ते २० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक मोहम्मद हुसेन शेख आणि क्लीनर महंमद समीर शेख (रा. मालेगाव) हे दोघे किरकोळ जखमी झाले. गोंदे येथून सिमेंट पोल भरून ट्रक घेऊन मालेगावकडे निघाला होता. यावेळी मोहदरी घाटातून नाशिककडे जात असताना ट्रक दरीत कोसळला.
तानाजी मालुसरे यांना अभिवादन
सिन्नर : स्वराज्याचे खरे पाईक व शिवरायांचे बालमित्र नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवजन्मोत्सव समिती, तानाजी चौक मित्रमंडळ व महामित्र परिवार यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहिली. समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, सल्लागार विनायक सांगळे, दत्ता वायचळे, वामन पवार, राजाराम मुरकुटे, राहुल बलक, उमेश गायकवाड, वामन गाडे, संतोष लुटे, संजय रायजादे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
वावी येथून दुचाकीची चोरी
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील शर्वरी लॉन्ससमोरून अज्ञात चोरट्याने विवाह सोहळ्यासाठी आलेल्या इसमाची दुचाकी चोरून नेली. बनवस्ती, शिर्डी येथून सोन्याबापू भीमाजी बनकर हे वावी येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. त्यांची दुचाकी त्यांनी लॉन्सबाहेर लॉक करून उभी केली होती. विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते दुचाकी घेण्यासाठी आल्यानंतर दुचाकीची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बनकर यांनी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास काळे अधिक तपास करीत आहेत.
दारणा नदीपात्रात युवकाचा मृतदेह सापडला
सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात दारणा नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह २६ तासांच्या शोधकार्यानंतर मिळून आला. रविवारी दुपारी ऋषिकेश एकनाथ वीर (२२) हा नदीकाठी कृषिपंप सुरू करण्यासाठी गेला होता. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ऋषिकेशचा पाय घसरून तो नदीपात्रात पडला होता. वडिलांनीही मुलाला वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जीवरक्षक गोविंद तुपे यांना मृतदेह शोधण्यात यश आले.