शहरालगतच्या दरेगाव , सायने बु. औद्योगिक वसाहतीमागील भाग व सवंदगाव शिवारातील गायदरा नाल्यास लागून असलेल्या वनविभागाच्या डोंगराळ भागात काही गौण खनिज माफियांकडून मुरमाची चोरी केली जात आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित असूनही कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. महसूल, वन, पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या परिसरात एके काळी दाट जंगल, हिरवाईने नटलेला डोंगर निसर्ग रम्य परिसर होते. त्यामुळेच याच परिसरात शहरातील नागरिकांच्या करमणुकीचे साधन म्हणून हिल स्टेशन बनविण्यात आले आहे. यालाच लागून असलेल्या परिसरातील डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरी केली जात असल्याने डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन होणारी गौण खनिज चोरी थांबवावी व डोंगर वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी निसर्गप्रेमी व नागरिकांकडून होत आहे.
सायने बुद्रुक शिवारातील डोंगरावर मुरुमाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 5:29 PM