सायखेडा : शिर्डी- सुरत महामार्गावरील भेंडाळी फाट्यावर असलेल्या दुकानांची दररोज फोडतोड होऊन मोठा ऐवज चोरी जात असल्यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत. त्यामुळे या चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलावीत व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यावसायिकांनी सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक काद्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गोदाकाठ भागातील सध्याचे सर्वांत गजबजणारे ठिकाण असलेल्या भेंडाळी फाट्यावर अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत, जवळपास दोनशे दुकाने रस्त्याच्या दुतर्फा असल्यामुळे याठिकाणी सातत्याने चोऱ्या होत आहेत. किराणा, कापड, हार्डवेअर, मेडिकल, स्टील, दवाखाना या दुकानांच्या मागील बाजूने मध्यरात्री दुकान फोडून चोरटे चोऱ्या करत आहेत.
सर्व चोऱ्या एकाच पद्धतीने होत असल्यामुळे एकच टोळी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी चोरटे कॅमेऱ्याकडे पाठ करतात किंवा कॅमेऱ्यावर कपडा टाकतात. त्यामुळे चोर ओळखू येत नाही. मात्र, हे माहीतगाराचेच काम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सायखेडा पोलीसदेखील रात्री-अपरात्री दोन वेळा गस्त घालतात; पण गाडीच्या सायरनच्या आवाजाने चोरटे पोबारा करतात. त्यामुळे गाडी गेली की, पुन्हा चोरी होते, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. यासंदर्भात अखेर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, राजेंद्र कुटे, उपसरपंच सोमनाथ खालकर, शरद खालकर, सोपान खालकर, संजय खालकर, शांताराम शिंदे, डॉ. मधुकर घुले, रमेश कमानकर, गोरख खालकर, संजय कमानकर, शरद शिंदे, विजय जाधव, बिटू खालकर, तानाजी सातपुते, संतोष कमानकर, वाल्मीक कमानकर, मच्छिंद्र खालकर, संजय पवार, गणेश देवकर, संतोष जाधव, संपत जाधव, सुनील सातपुते, लालजी कमानकर, प्रकाश शिंदे, नितीन कमानकर, अनिस तांबोळी, राजू दिघे, गणपत शिंदे, दशरथ जाधव आदी व्यावसायिक सहभागी झाले होते.
(२० भेंडाळी)
भेंडाळी येथील चोऱ्यांचे सत्र थांबवावे यासाठी सायखेडा पोलीस स्टेशनचे काद्री यांना निवेदन देताना सुरेश कमानकर, शरद खालकर, संजय खालकर व इतर.
200921\293120nsk_57_20092021_13.jpg
भेंडाळी येथील चोऱ्यांचे सत्र थांबवावे यासाठी सायखेडा पोलीस स्टेशनचे काद्री यांना निवेदन देतांना सुरेश कमानकर, शरद खालकर, संजय खालकर व इतर.