सुरगाणा : येथील पेट्रोलपंपावर झालेल्या दहा लाख रुपयांच्या धाडसी चोरीची उकल तपास पोलीस अधिकारी व पथकाने यशस्वीपणे केली असून, त्यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केलेल्या तपासात पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच ही धाडसी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.सुरगाणा-उंबरठाण रस्त्यालगत रत्नशिलराजे पवार यांच्या पेट्रोलपंपावर गेल्या रविवारी (दि.२२) रात्री दहा ते बारा वाजेच्या दरम्यान आॅफिसमधील तिजोरीतून नऊ लाख ६३ हजार रुपयांची चोरी झाली होती. ही चोरी करताना खिडकीचा एक गज कापण्यात आला होता तर तिजोरी ठेवण्यात आलेल्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेराची वायर कापण्यात आली होती. सदरची चोरी कोणतीही तोडफोड न करता तिजोरीच्याच चावीने तिजोरी उघडून चोरी करण्यात आली होती. यावेळी आॅफिसमधील कॅमेरा बंद असला तरी त्याचे व्हाईस रेकॉर्डिंग चालू होते. त्यामुळे चोरी करतेवेळीचे आवाज तसेच पेट्रोलपंप परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील संशयास्पद फुटेज पोलिसांनी बारकाईने तपासले असता या पेट्रोल पंपावरील कर्मचारी गोविंद यशवंत वाघमारे (२६) रा. सूर्यगड, कृष्णा जाणू गायकवाड (३१), गाळबारी व नीलेश देवराम वाघमारे (२६) रा. पळसन या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. (वार्ताहर)
सुरगाण्यातील पेट्रोलपंपावरील चोरीची उकल
By admin | Published: November 30, 2015 11:49 PM