देवळा : गतवर्षी कांद्याचे दर तेजीत असताना तालुक्यात चाळीतून कांदे चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. चालूवर्षी चोरांची वक्रदृष्टी तूर पिकाकडे वळली असून वाजगाव येथील ज्ञानेश्वर तानाजी देवरे यांच्या शेतातील तुरीच्या शेंगा चोरीला जाण्याची घटना घडली.
वाजगाव येथील कोलते शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर तानाजी देवरे या शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी आपल्या एक एकर क्षेत्रावर (गट नं ४९५/१ )तुरीची लागवड केली होती.पिकाचे योग्य संगोपन केल्यामुळे सर्व झाडे तुरीच्या शेंगांनी लगडली. काढणीयोग्य झालेली तूर विकून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल असे स्वप्न देवरे पाहत असतानाच रविवार दि. १२ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उभ्या पिकातील तुरीच्या शेंगा चोरून नेल्या. घाईगर्दीत शेतातील तुरीची झाडे ओरबाडूनही चोरी करण्यात आली. सोमवारी सकाळी ज्ञानेश्वर देवरे यांना शेतातील तुरीच्या शेंगा चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी देवळा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पोलीस हवालदार सुनील पवार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
----------------------
साडेतीन वर्षांपूर्वी तालुक्यातील वरवंडी, मटाणे आदी गावात शेतातील कांदा चोरीला जाण्याच्या घटना घडल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी या चोरीचा यशस्वी तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर तालुक्यात शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, परंतु देवळा पोलिसांना या चोरट्यांचा शोध घेण्यात अपयश आल्यामुळे चोरीच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे. (१६ वाजगाव)
160921\16nsk_17_16092021_13.jpg
१६ वाजगाव