ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या असून पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे.तालुक्यातील ठाणगाव ही सर्वात मोठी बाजारपेठ आसून या ठिकाणी अनेक गावातील लोक कामानिमित्ताने ये-जा करत असतात. रविवारी रात्री बारा नंतर ठाणगाव पोस्ट कार्यालयाचा दरवाजा तोडून त्यामध्ये असणारे ३४०० रुपये चोरटयांनी चोरुन नेले. कार्यालयातील कपाट कटरच्या सहाय्याने कापून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. हॉटेल मनशांती रेस्टॉरन्टचे शटर वाकवून आत प्रवेश करून चोरट्यांनी दोन हजारांची चिल्लर लंपास केली. त्यानंतर विविध विकास सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातील कुलूप तोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त करून सोसायटी जवळच राहणारे आप्पा खोकले यांच्या घरातील कुलूप तोडून नेकलेस व कर्णफुले लंपास केली. त्याच परिसरात राहणारे एकनाथ गबाजी काकड यांच्या घरातील कुलूप तोडून कपाट तोडून सामान फेकून दिले. नामेदव रामजी काकड, ललिता काकड, राधाकिसन शिरसाठ यांच्या घरातील कुलपे तोडून कपाटातील वस्तूची फेकझोक केली.यापूर्वी भुरट्या चोऱ्या या भागात झालेल्या होत्या. पण एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडी झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. चोरट्यांनी चोरी करताना कटरचा वापर केला आहे. सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ठाणगावी एकाच रात्री आठ ठिकाणी चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 9:19 PM