नाशिक: नाशिक पुणे या रेल्वे प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील जमिनीचे मूल्यांकन जाहीर करण्यात आल्यानंतर खरेदीचा व्यवहार करण्यासाठी काही शेतकरी पुढे आले आहेत. मात्र, अजूनही अनेक शेतकरी जादा दराच्या मागणीसाठी अडून बसल्याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी संमतीने जमीन हस्तांतरणाची तयारी दर्शविली नाही तर पुढील पाच महिन्यांत सक्तीने भूसंपादन केले जाऊ शकते, अशी बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सक्तीने भूसंपादन करण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांनाच आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झालेली असतांना नाशिक जिल्ह्यात मात्र काहीसा अडथळा निर्माण होऊ पाहत आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच शेतकऱ्यांना जमिनीचा पाचपट भाव देण्यात आलेला आहे. काही व्यवहारांना सुरुवात झालेली असली तरी काही शेतकरी अजूनही अडून बसलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री, वडझिरे, पाटपिंप्री या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले आहे. शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रकारानुसार मिळणाऱ्या मोबदल्याविषयी माहिती दिली जात आहे. जिल्हा समितीने जाहीर केलेले आठ गावांमधील दर हे कायदेशीरदृष्ट्या व नियमानुसार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी या पाचपट दरानुसार खरेदीची प्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून, अन्यथा पुढील पाच महिन्यांत सक्तीने भूसंपादन करण्याची कायदेशीर प्रक्रिया केली जाऊ शकते, असा इशारा दिला आहे.
--इन्पो-
सिन्नर तालुक्यातील १७ गावे
पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या तीनही शहरांमधील औद्यागिक आणि कृषी विकासाला हातभार लागणार असल्याचे सांगितले जाते. सुरक्षित आणि जलद मालवाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग फायदेशीर ठरेल, असे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना वारंवार सांगितले गेले आहे. या मार्गामुळे नाशिक आणि पुणे यामधील अंतर १ तास आणि ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. नाशिक तालुक्यातील ५ आणि सिन्नर तालुक्यातील १७ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.
--इन्फो--
थेट खरेदी दिल्यास कायद्यानुसार भूसंपादन केल्यास
१) दरानुसार पाचपट व न. पा. हद्दीत २.५ पट दर मिळणार. १) ग्रामीण भागात ४ पट न. पा. हद्दीत दुप्पट दर मिळेल.
२) २४ तासात मोबदला रक्ककम खात्यात जमा होणार. २) मोबदल्यासाठी २-३ वर्षे लागू शकतात.
३) समितीने बाजार मूल्याच्या १.५ दुप्पट दराने मान्यता दिली. ३) बाजार भावाचा (रेडीरेकनर) दर निश्चित करण्यात येतो.
------इन्फो---
थेट खरेदीने जमीन दिल्यास पाटपिंप्रीच्या शेतकऱ्यांना पाचपट प्रमाणे ५५ लाख ६१ हजार मिळणार आहेत. परंतु कायद्यानुसार भूसंपादनाची वेळ आली तर ३० लाख ९६ हजारांपर्यंत दर येतील. हीच बाब बारागावपिंप्रीच्या बाबतीत आहे. थेट खरेदी दिल्यास ६२ लाख ६४ हजार मिळणाऱ्या जमिनीला कायद्यानुसार भूसंपादन झाल्यास ३३ लाख ८० हजार इतकाच दर मिळेल.