नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या कालिदास कलामंदिरचे अवाच्या सवा भाडे वाढविण्यात आले आहेत. या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. कालिदासची दरवाढ झाल्याने आजवर वर्षानुवर्षे या संस्थेत मिळणारा जिव्हाळा क्षणात दूर होऊन तेथे व्यावसायिक वृत्ती वाढीस लागली आहे. याचा फटका आयोजकांना तर बसेलच, पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे कालिदासची भाडेवाढ मागे घ्यावी, अशा भावना वितरक, शैक्षणिक संस्था, नृत्यसंस्था आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद. कालिदासचे एवढे वाढलेले भाडे परवडणारेच नाही. थोडीफार वाढ केली असती तर ते समर्थनीय झाले असते, पण ही वाढ फारच आहे. मुळात नृत्य संस्था नृत्यमहोत्सव मोफत सादर करत असतात. प्रेक्षकांकडून त्याचे पैसे घेतले जात नाही. विद्यार्थ्यांकडून वर्गणी काढून वा इतर ठिकाणांहून पैसे जमवून नाट्यगृहाचे भाडे, प्रवासखर्च आदी भागवला जातो. कालिदासने मोफत लाइट साउंड मॅनेज करून द्यावे. दरवाढ केली तर कला जोपासना कठीण होईल.- सोनाली करंदीकर, नृत्यांगनाकालिदास हा आम्हा कलाकारांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शास्त्रीय कलांना प्रोत्साहन देण्याचे काम कालिदासच्या माध्यमातून होते. आमच्यासारखे कलाकार शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम करताना तेथे फारशी आर्थिक उलाढाल करत नाही. त्यामुळे ही गोष्ट ओळखून आम्हाला आजवर सेवा मिळत आली. ती पुढे मिळेल याची शाश्वती वाटत नाही. कालिदासने केलेली भाडेवाढ पाहता वर्षातून एकदा तरी तेथे कार्यक्रम करणे शक्य होइल का? याची शंका वाढते. इतर कार्यक्रमांना तिकीट दरवाढ झाली तर लोक येतील का? हाही प्रश्न निर्माण होतो. दरवाढ मागे घ्यावी. - सुमुखी अथनी, नृत्यांगनाकालिदासचे वाढवलेले भाडे खूपच जास्त आहे. हे दर आता पुण्या-मुंबईतील दरांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे, पण तेथील सांस्कृतिक वातावरण आणि इथले वातावरण यात खूप फरक आहे. तो समजावून घेतला पाहिजे. भाडेवाढीमुळे तिकीट दर वाढतील. लोकांवर आर्थिक बोजा येऊन प्रेक्षकसंख्या घटेल. कालिदासची ओळख जर कलेला व्यासपीठ देणारे असेल तर अशा दरवाढीने ती पुसट होऊ शकेल. ही दरवाढ मागे घेणे गरजेचे आहे. अन्यथा कलावंतांना याठिकाणी कार्यक्रम करणे अवघड होईल. - विद्या देशपांडे, ज्येष्ठ नृत्यांगना