नाशिक- सिडकाेतील शाळकरी मुले आणि अन्य नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने उड्डाणपूल साकारण्यासाठी सर्व प्रकारच्या कायदेशीर पूर्तता करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही पूल रद्द करण्याची मागणी करून भाजपाचे संबंधित नेते सिडकोविषयी असलेला द्वेष दाखवत असल्याचा आरोप या परिसराचे नगरसेवक आणि शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. उड्डाणपुलाचे राजकारण आता व्यक्तिगत पातळीवर नेले जात असून, बडगुजर कंपनीशी माझा २००६ नंतर कोणताही संबंध नाही, आता संबंध असल्याचे सिद्ध केल्यास राजकारण सोडून देईल, असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे.
सिडकोतील उड्डाणपुलासंदर्भात वाद सुरू असून त्यामुळे भाजपाने पुलासाठी आग्रह धरणाऱ्या बडगुजर यांचे ठेकेदाराशी संबंध असल्याच्या तसेच बडगुजर ॲड बडगुजर कंपनीचे आर्थिक व्यवहार तपासणीसाठी पत्र देण्याच्या घडामाेडी गाजत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी हे मत व्यक्त केले.
प्रश्न- मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसताना उड्डाणपुलाचा आग्रह कशासाठी?
बडगुजर- मुळात दिव्या ॲडलॅब ते पेठे हायस्कूलदरम्यान हा उड्डाणपूल शाळकरी मुले आणि वाहतूक नियमनासाठी तयार करण्याचे नियोजन हेाते. मात्र, माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सिटी सेंटर मॉलजवळील चौकातील अडचण बघता हा पूल या चाैकापर्यंत वाढवण्याचे ठरवले त्यानुसार महापालिकेने आर्थिक तरतूद केली. निविदा मागवल्या आणि आता ११ मे रेाजी कामाची वर्क ऑर्डर दिली जात असताना भाजपाने विरोध सुरू केला. २४ एप्रिल रोजी महापौरांनी पूल रद्द करावा, असे पत्रही दिले. ज्या सिडकोने भाजपाला दोन आमदार दिले आणि आठ नगरसेवक दिले. त्या भाजपने सिडकोबाबत इतका दुश्वास का बाळगावा, हा प्रश्न आहे.
प्रश्न- महापौरांनी महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने विरोध केल्याचे म्हटले आहे.
बडगुजर- या पुलाचा आणि इलेक्शन इयरमध्ये होणाऱ्या कामाचा संबंध येत नाही. याचे कारण म्हणजे पुलाचे काम तीन वर्षे चालणार आहे. आता तर खड्डे करणे आणि अन्य कामे करण्यातच आर्थिक वर्ष निघून जाईल. पुलासाठी एकूण खर्च दीडशे कोटी असला तरी एका वर्षात ही रक्कम खर्च हेाणार नाही तर झालेल्या कामानुसार टप्प्याटप्प्याने बिल दिले जाते, या पुलाच्या खर्चाचा अन्य नागरी कामांवर परिणाम होण्याचा संबंधच येत नाही.
प्रश्न- बडगुजर ॲड कंपनीच्या कामाची माहिती भाजपाने मागवली आहे.
बडगुजर- त्यांनी काहीही माहिती मागवली तरी फरक पडत नाही. बडगुजर कंपनीशी मी संबंधित होतो; पण २००६ मध्ये मी राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडलोे. आता केवळ नामसाधर्म्याचा संबंध आहे. या कंपनीशी माझे संबंध असल्याचे पुरावे दिले तर राजकारण सोडून देईल; परंतु असे आरोप करू नये.
कोट..
तर महापौरांच्या हस्ते भूमिपूजन
महापौरांनी उड्डाणपुलाला विरोध नाही, असे सांगितले. मात्र, दुसरीकडे पुलाचे काम स्थगित करण्याऐवजी पूलच रद्द करण्याचे पत्र दिले. त्यामुळे काम अडवून तर दाखवा, असे मी आव्हान दिले. भाजपाने परिपक्वता दाखवली आणि विरोध सोडला तर महापौरांच्या हस्तेच मी या पुलाचा नारळ फोडेल.