नाशिक : नाशिककरांच्या तोंडाचे पाणी पळवून मराठवाड्यास पाणी सोडल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या भारतीय जनता पक्षाला या प्रश्नावरून घेरण्याची तयारी विरोधकांसह मित्रपक्षाने केलेली असताना भाजपा मात्र पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाचा आदेश होता. भविष्यातही असा निर्णय झाला तर पाणी सोडावेच लागेल, असे भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागील काळात नाशिकच्या गंगापूर धरणातच पाणी नसताना त्याबाबत महाराष्ट्र जल नियामक आयोगाला आवश्यक ती माहिती न पुरविल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले होते. या पाणी सोडण्याच्या मुद्द्याचा विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेनेही भांडवल करीत भाजपा आमदारांच्या घरांसमोर घंटानाद केला होता. तसेच हे पाणी भाजपाच्या नाकर्तेपणामुळेच सोडावे लागल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पक्षाची बाजू मांंडताना सांगितले की, पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारचा नव्हता. तो आदेश न्यायालयाने दिल्याने मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले होते. पाणी वाटपाबाबत स्वतंत्र कायदा असून, त्यात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी सोडलेले पाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोडण्यात आलेले होते. त्यातही राज्य सरकारने बाजू मांडल्याने मराठवाड्याला कमी पाणी सोडावे लागले होते. भविष्यातही न्यायालयाने आदेश दिले तर पाणी सोडावे लागेल. शेवटी न्यायालयाचे निर्देश सर्वांना बंधनकारक असतात. (प्रतिनिधी)
...तर पुन्हा मराठवाड्याला पाणी सोडावे लागेल : भाजपा
By admin | Published: January 26, 2017 12:50 AM