पंचवटी : पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक मनपाने तपोवनातील साधुग्राम प्रवेशद्वारावर आकर्षक दगडी कमान उभारून कमानीवर २५ पितळी घंटा बसवून प. पु. जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार असे नामकरण केले होते. दोन वर्षांपूर्वी कमानीवरील चोरीस गेलेल्या दोन घंटा मनपाने बसविल्या नाही. येत्या आठ दिवसांत मनपाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वखर्चाने पितळी घंटा खरेदी करून त्या कमानीवर बसविणार असल्याचे निवेदन मनसेतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.
एकीकडे स्मार्ट स्वच्छ सुंदर नाशिक वल्गना करीत स्वतःची पाठ थोपटणारे आताचे मनपातील सत्ताधारी मनसे सत्ता काळात झालेल्या शहर सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या अनेक कामांच्या देखरेखीत पूर्णत: कुचकामी ठरले आहे. सिंहस्थामुळे नाशिकची जगभर ओळख आहे सिंहस्थनगरी प्रवेशद्वारावर दगडी कमानीवरील चोरीस गेलेल्या पितळी घंटा बसविण्यास मनपाकडे निधी नाही, वेळ नाही की इच्छाशक्तीचा अभाव आहे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.
तपोवनातील सिंहस्थनगरी प्रवेशद्वारावरील कमानीच्या चोरीस गेलेल्या या दोन पितळी घंटांच्या जागी येत्या आठ दिवसांत नवीन घंटा बसविण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने प्रवेशद्वार कमानीवर नवीन पितळी घंटा बसवेल, असे निवेदन मनसेतर्फे मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलिम शेख, योगेश शेवरे, गटनेता नंदिनी बोडके, वैशाली भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, विक्रम कदम, रामदास दातीर, योगेश लभडे, महिला आघाडी शहराध्यक्षा अर्चना जाधव, कौशल पाटील, सौरभ सोनवणे, स्वागता उपासनी, पराग भुसारी, गणेश शेजुळ, आदींच्या स्वाक्षरी आहेत.