आरटीओमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत आणि क्रिम पोस्टिंग मिळविण्याकरिता तसेच अन्य प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिक पोलिसांकडे केली आहे. त्या तक्रारीवरून गुन्हे शाखेमार्फत चौकशी गुरुवारपासून (दि. २७) सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत तक्रारदार वगळता नऊ शासकीय अधिकाऱ्यांसह दोन खासगी व्यक्तींचा चौकशीदरम्यान जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.
मंगळवारी (दि. १) तक्रारदार पाटील यांच्यासह मंत्रालयातील परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, सहसचिव प्रकाश साबळे यांनाही दिवसभर चौकशीला सामोरे जावे लागले. तक्रारीत संबंधितांवर करण्यात आलेल्या आरोपांशी निगडित विविध कागदपत्रे घेऊन जाब-जबाब नोंदविले गेले. बुधवारी (दि. २) तक्रारदार पाटील यांना पुन्हा चौकशीसाठी आयुक्तालयात हजर राहण्याबाबत लेखी आदेश देण्यात आल्याचे चौकशी अधिकारी उपायुक्त संजय बारकुंड यांनी सांगितले. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.
दरम्यान, त्यांच्याकडे आरोपांशी निगडित अजून काही ठोस पुरावे असल्याचा दावा तक्रारदाराकडून करण्यात आल्याने बुधवारी पुन्हा पाटील यांना चौकशीकरिता बोलविण्यात आले आहे.
चौकट
आणखी तिघांना बजाविला समन्स
पोलिसांच्या तपासात या भ्रष्टाचारासंबंधी नागपूर येथील नरेश सतदेव ऊर्फ नरेंद्र शर्मा आणि धुळे येथील नागसेन बागुल ऊर्फ बाबू यांची चौकशी होणार आहे. गुरुवारी (दि. ३) या दोघांची चौकशी प्रस्तावित आहे. यापैकी एक व्यक्ती तक्रारदाराचा मावसभाऊ असल्याचे समजते. तसेच मंगळवारी गुन्हे शाखेच्यावतीने या तक्रारीशी संबंधित दोघा खासगी व्यक्तींसह एका शासकीय अधिकाऱ्याला चौकशीकरिता हजर राहण्याबाबत समन्स बजावला आहे.
--इन्फो--
चौकशीला पाच दिवसांची मुदतवाढ
गुरुवारपासून पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे पाण्डेय यांनी आदेश दिले होते. मात्र, तक्रारदार पाटील हे चौकशीला सुरुवात झाल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांसमोर प्रकटले. यामुळे चौकशी अधिकारी यांनी पाण्डेय यांच्याकडे सात दिवसांची मुदतवाढ मागितली होती; मात्र त्यांनी चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी याकरिता पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे.