नाशिक : द्राक्षमळ्यात तारेच्या जाळ्यात बिबट्या अडकतो... पाच तासांपासून बिबट्या सुटकेसाठी प्रयत्न करत आक्रमक होतो... डरकाळ्यांचा आवाज आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कानी पडतो... सगळेच मळ्याच्या दिशेने धाव घेतात आणि याचवेळी एक तरुण अतिउत्साह दाखवत अडकलेल्या बिबट्यासोबत चक्क ‘सेल्फी’ टिपण्यासाठी आटापिटा करतो, हे बघून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. चाडेगाव शिवारातील द्राक्षमळ्यात मृतावस्थेत पडलेले डुक्कर खाण्यासाठी नर बिबट्या पहाटेच्या सुमारास शेतात आला; मात्र येथील द्राक्षबागेला लावलेल्या जाळीमध्ये त्याचे मागील दोन्ही पाय आणि शेपूट अडकली. वाघ मळ्यात बिबट्या द्राक्षबागेत अडकल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. बघ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेत गर्दी केली. यावेळी गर्दीमधील एका अतिउत्साही तरुणाने तर प्रताप केला. अडकलेल्या बिबट्याच्या अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या अंतरावरून त्याने बिबट्याच्या तोंडाच्या दिशेने पाठ करत खाली बसून ‘सेल्फी’ क्लिक केली. एकदा नव्हे तर दोन, तीनवेळा तो तरुण ‘सेल्फी’ टिपण्याचा प्रयत्न करताना चित्रफितीत दिसतो. यावेळी आजूबाजूचे लोक त्याचे नाव घेत ओरडून त्यास बाजूला होण्यास सांगतानाही लक्षात येते; मात्र तरुणाने कोणाच्याही म्हणण्याकडे लक्ष न देता ‘सेल्फी’ची हौस भागविली. सुदैवाने यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, अशी चर्चा उपस्थित जमलेल्या नागरिकांमधून सुरू होती.भक्ष्याचा पाठलाग करताना तोंडी आलेला घास निसटला आणि बिबट्या जाळ्यात फसला त्यामुळे तो अधिक आक्रमक व चवताळलेला होता. वनविभागाच्या कर्मचाºयांपुढेही त्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. अशावेळी प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करण्याऐवजी तरुण वर्ग बेजबाबदार व बेभानपणे वागत सेल्फी व छायाचित्रे काढण्यासाठी स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात....अन्यथा पळता भुई थोडी झाली असतीबिबट्याचे मागील पाय जाळी व तारेमध्ये अडकलेले होते. तसेच बिबट्या कमी वयाचाही नव्हता. नर बिबट्या पूर्णत: प्रौढ असल्याने शरीराने मजबूत व ताकदवान होता; मात्र शेपटाला तारेचा पीळ बसल्यामुळे त्याचे निसटण्याचे प्रयत्न कमी पडले. अन्यथा जमलेल्या बघ्यांना पळता भुई थोडी झाली असती आणि अशा सेल्फीचा नाद करणाºयांनाही त्याचा फटका बसला असता, अशी चर्चा सुरू होती.
...तर ‘सेल्फी’चा नाद जिवावर बेतला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:47 AM