नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित राहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते. त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर जाऊन समन्स बजावण्यात आला होता, असे ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी त्यांच्याविषयीची आठवण सांगितली. या खटल्यात चव्हाण हे दिलीपकुमार यांच्याविरुध्द पक्षाचे वकील होते. फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे समन्स गेल्यानंतरही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नावाचे वॉरंटदेखील न्यायालयाकडून काढण्यात आले होते. यानंतर दिलीपकुमार यांनी सुनावणीच्या तारखेला जिल्हा व सत्र न्यायालयात हजेरी लावली. फौजदारी खटल्यात त्यांनी हजर होण्याची ही पहिलीच वेळ होती. याप्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी त्यांची झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने न्यायालयाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सुनावणी सुरू असेपर्यंत शहराच्या मध्यवर्ती सीबीएससारख्या भागात नागरिकांची गर्दी कायम होती. पोलिसांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला गर्दी थांबवून ठेवली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान चव्हाण यांच्याकडून युक्तिवादादरम्यान त्यांच्या जामीन अर्जास विरोधही करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत दिलीपकुमार यांची जामिनावर मुक्तता केली होती. त्यानंतर दिलीपकुमार यांनी विरुध्द पक्षाच्या तडजोडीचा प्रस्ताव मान्य करत या जमीन वाद प्रकरणावर पडदा टाकून समझोता केला होता. यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यात आले होते. या प्रकरणात महिला जमीन मालकास दिलीपकुमार यांनी काही रक्कमदेखील अदा केली होती. हा खटला थेट उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला होता.
---इन्फो--
दिलीप सहाब नाशिकच्या प्रेमात
दिलीप कुमार यांचे बालपण नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गेलेले असल्यामुळे त्यांचा तसा नाशिकशी जिव्हाळ्याचा ऋुणानुबंध आला होता आणि तो अखेरपर्यंत कायमच राहिला. गंगा जमुनासारख्या हिट चित्रपटाच्या शूटिंगकरितासुध्दा दिलीप सहाब यांनी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील इंग्रज काळातील रोकडे वाड्याला पसंती दिली होती. नाशिकसोबत ते नेहमीच ‘कनेक्ट’ होते. येथील आल्हाददायक वातावरण, त्यावेळेचे टुमदार शांत शहर आणि निसर्गरम्य वातावरण अशा सर्वांमुळे या महानायकाला नाशिकच्या प्रेमात पडण्याचा मोह आवरता येऊ शकला नव्हता.