नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. तसेच एअर स्ट्राईक लष्कराने केला अन् 56 इंच छाती कोण फुलवतंय तर मोदी अशी टीका पवारांनी मोदींवर केली. नाशिक येथील सय्यद पिंप्री येथे घेण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत पवारांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, काश्मीर येथे कर्तव्य बजावताना पायलट निनाद मांडवगणे हॅलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. देशासाठी प्राण दिले याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी सरकारला सांगावं की, शहीदांचा राजकीय फायदा तुम्ही घेऊ नका असं शरद पवारांनी सांगितले.
राज्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात माझ्यावर टीका करतात. माझ्या घराण्यात वाद सुरू आहे, पुतण्यानं पक्ष ताब्यात घेतला अशी टीका मोदींकडून माझ्यावर करण्यात येते. मात्र मोदींना कुटुंब नाही, मला कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना कुटुंब नाही म्हणून उगाच कुठेही टिप्पणी करतात असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. त्याचसोबत नरेंद्र मोदींनी देशाची काळजी करावी, माझ्या कुटुंबाची करु नका असा चिमटाही पवारांनी काढला
मोदी यांच्या भाषणातून गांधी घराणे आणि काँग्रेसवर टीका केली जाते. देशासाठी काँग्रेसने काहीच केलं नाही असा आरोप पंतप्रधान मोदी करतात याचा शरद पवारांनी समाचार घेतला. जवाहरलाल नेहरूंनी 11 वर्ष देशासाठी तुरुंगात घालवली, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि मोदी म्हणतात त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. नरेंद्र मोदींना सरकारच्या कामगिरीबद्दल सांगण्यासाठी काही नाही म्हणून गांधी घराण्यावर टीका करतात असा आरोप शरद पवारांनी केला.
तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांदा महागला तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मागच्या सरकारमध्ये कांदा महागला म्हणून भाजपानं आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांदा भाव पडताय. भावात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय असंही शरद पवारांनी सांगितले.
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ केल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. गहू आणी तांदूळ दरात या सरकारनं अत्यल्प वाढ केली. सर्व शेतीमाल उत्पादनात मोदी सरकारनं आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी. शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती चमत्कार करू शकते असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.