लर्निंग लायसन्सकरिता (शिकाऊ अनुज्ञप्ती) अर्ज करणाऱ्या उमेदवारास ‘परिवहन’ या संकेतस्थळावर स्वतःचा अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर अर्जदारांचे नाव पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल. यामुळे अर्जदाराचे ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आरटीओ ला गरज भासणार नाही. यानंतर अर्जदार रस्ता सुरक्षाविषयक व्हिडीओची पाहणी करुन आपल्या घरात बसून सहजरित्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देऊ शकणार आहे. चाचणी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे ६० टक्के अचूक उत्तर दिल्यास चाचणी उत्तीर्ण होऊन त्यास घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रत (प्रिंट) मिळेल, असा दावा आरटीओ प्रशासनाने केला आहे. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही आणि त्यांचा वेळेचीही बचत होणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी म्हटले आहे.
---इन्फो---
वैद्यकीय प्रमाणपत्रही देता येईल ऑनलाइन
नमुना १ (अ) मेडिकल सर्टिफिकेट सुध्दा डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पध्दतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्र मार्फत विकसित करण्यात आली असून याद्वारे अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करण्यात येईल आणि नमुना १ ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक डॉक्टरांनी संबंधित परिवहन संकेतस्थळामार्फत अर्ज करावयाचे असून त्यांची कागदपत्रांची पडताळणी करुन परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी द्यावयाचे आहेत.