नाशिक : चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे. शिक्षक, पालक, नातेवाईक यांनी मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यात आदरयुक्त धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळीच हा धोका ओळखून पालक-शिक्षकांनी पावले उचलली नाही तर मुलांचा धाडसीपणा वाढत जाऊन पुढची पिढी बेजबाबदार व दुराग्रही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी मोठ्यांची असून, ती त्यांना पार पाडावीच लागेल, असे मत मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगत्ज्ज्ज्ञ, अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे. मुले ऐकत नाहीत, उलट उत्तरे देतात. त्यामुळे पालक म्हणून हल्ली रोज पोटात भीतीचा गोळा उठतो. महागाई पाहता नोकरी करण्यावाचून पर्याय नाही. मुले म्हातारपणाची काठी होतील ही अपेक्षा तर केव्हाच सोडून दिली आहे. पण मोठेपणी ते आदर्श नागरिक होतील का, समाजात स्वत:चे चांगले स्थान निर्माण करतील का, दोन पैसे कमवून किमान स्वत:चे पोट भरू शकतील का याचीही शाश्वती वाटत नाही. - मंगला किणीकर, पालक, कॉलेजरोड पालकांचा धाक न वाटणे, उद्धटपणा वाढणे याला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत. गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे मुले सैरभैर झाली आहेत. त्यामुळे समजत असूनही ते चुकीच्या गोष्टी करत आहेत. पालक कधी खूप मोकळीक देतात, तर कधी अतिधाक दाखवतात. विभक्त कुटुंबामुळे मुले एकटी पडतात. मुलांमध्ये भावनिक बांधिलकी उरलेली नाही. कुटुंब, पालक, मित्र यांच्याशी कोरडी, कामचलाऊ मैत्री करण्यावर ते भर देत आहेत. - शामा कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ सोशल मीडिया, मोबाइल, पैशांची समृद्धी या साºयामुळे हल्लीची किशोरवयीन पिढी उद्धट होत चालली आहे. याला मुले जितकी कारणीभूत आहेत, तितकेच पालकही कारणीभूत आहेत. एकीकडे मुले अभ्यासात मागे पडताच शिक्षकांवर दबाव आणला जातो, तर दुसरीकडे शाळेने थोडी जरी कडक भूमिका घेतली तरी लगेच शाळा गाठत जाब विचारला जात आहे. - रमादेवी रेड्डी, प्राचार्य, स्कॅटिश अकॅडमी
संवादाअभावी मुले होताहेत बेदरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:28 AM