नाशिक : दोन महिन्यांपासून ग्राहकांना देयक न देणाऱ्या दूरसंचार खात्याने देयक भरण्याच्या मुदतीआधीच थेट ग्राहकांची सेवाच खंडित केल्याने हजारो दूरध्वनी ग्राहकांना नसता मनस्ताप सोसावा लागला आहे. विशेष म्हणजे आपल्या या कृतीची ना खेद, ना खंत वाटणाऱ्या दूरसंचार खात्याने ग्राहकांकडून देयकाची रक्कम वसूल केली, परंतु सेवा सुरू करण्याचा सोयिस्कर विसर पडला आहे. शहरातील एन. डी. पटेल रोडवरील दूरसंचार खात्याच्या मुख्यालयातच ही बाब घडली आहे. जून व जुलै अशा दोन महिन्यांची देयके ग्राहकांना पाठविण्याचा दूरसंचार विभागाला विसर पडला, त्यातही जुलै महिन्याचे देयक आॅगस्टच्या २६ तारखेपर्यंत भरण्याची अंतिम मुदत असताना दूरसंचार खात्याने २३ आॅगस्ट रोजीच ग्राहकांची सेवा खंडित करून टाकली. मुळात दूरध्वनीचे देयक ग्राहकांना प्राप्तच झालेले नसल्यामुळे ते कधीपर्यंत भरायचे व किती भरायचे याबाबत अनभिज्ञ असलेल्या ग्राहकांनी तब्बल दोन महिने देयकाची वाट पाहिली. परंतु त्याबाबत दूरसंचार खात्याने आपली चूक कबूल न करता, उलट देयक न भरल्याचा ठपका ग्राहकांवरच ठेवून त्यांची सेवा एकतर्फी खंडित केली. दूरध्वनी बंद पडल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना नंतर दूरसंचार खात्याने देयकाची माहिती दिली, एवढेच नव्हे तर दोन महिन्यांपासून देयक पाठविलेले नसल्याचे सांगून २६ आॅगस्ट रोजी देयक भरण्याची अंतिम मुदत असताना त्यापूर्वीच दूरध्वनी सेवा नजरचुकीने खंडित झाल्याची चूक कबूल केली आहे. दूरसंचार खात्याच्या या भोंगळ कारभाराचा शेकडो ग्राहकांना फटका बसला, दूरध्वनीचे देयक भरल्यानंतरही अनेक ग्राहकांचे दूरध्वनी सुरू होऊ शकलेले नाहीत. (प्रतिनिधी)
देयके नाहीत, मात्र दूरध्वनी सेवा खंडित
By admin | Published: August 26, 2016 12:25 AM