पदे अडकवून ठेवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 07:34 PM2019-02-05T19:34:38+5:302019-02-05T19:35:01+5:30
दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : कॉँग्रेस पक्षाची जडणघडण कार्यकर्त्यांच्या बळावर झाली असून, पक्षात काम करणा-या प्रत्येकाला वेळोवेळी पक्षाने मानाचे स्थान दिले आहे, परंतु पक्षाचे काम न करता निव्वळ पदे अडकवून ठेवणा-यांना यापुढे पक्षात स्थान मिळणार नसल्याचे सांगतानाच अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वालसी चांदरेड्डी यांनी, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्याचे जाहीर करून शेवाळे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करणा-यांची तोंडे बंद केली आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व उत्तर महाराष्टÑाचे प्रभारी वालसी चांदरेड्डी यांच्या उपस्थितीत शेवाळे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी बोलताना रेड्डी यांनी, पक्षाची वाटचाल अवघड वळणावर असली तरी, पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी देश पिंजून काढत असून, येणाºया निवडणुकीच्या तयारीला पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे. एकाच पदावर पंधरा वर्षांपेक्षा अधिक झालेल्या जिल्हाध्यक्षांना बदलण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यात खांदेपालट करण्यात आले आहेत. त्यामुळे हा फेरबदल कॉँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त करून देईल, त्यासाठी सर्वांनी शेवाळे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी. निवडणूक तयारीचा भाग म्हणून ब्लॉकनिहाय बूथ कार्यकर्ते नेमावे लागणार असून, आगामी काळात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय अशा बूथ कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना नवनियुक्त डॉ. तुषार शेवाळे यांनी, पद हे कामासाठी असते भूषणासाठी नाही याची आपल्याला जाणीव असून, पक्ष संक्रमण अवस्थेतून जात असल्याची जाणीव ठेवूनच आपली आगामी वाटचाल राहणार आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांशी माझी बांधिलकी असल्यामुळे आपल्या कार्यकाळात गटबाजीला कोणताही थारा नसेल असे सांगून शेतमालाला भाव, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि तरुण शेतकºयांची आत्महत्या अशा घटनांचे आव्हान समोर उभे असल्याने त्याविरुद्ध सरकारला जाब विचारला जाईल, त्याचबरोबर पक्षकार्य करताना शहर व ग्रामीण अशी फळी न ठेवता एकदिलाने काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सध्या जिल्हा कार्यकारिणी आहे तशीच ठेवण्यात येणार असून, याच कार्यकारिणीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल, अशी घोषणा केली. मावळते अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी, जिल्हाध्यक्षपद हे काटेरी मुकुट असून, ज्यावेळी यश मिळते त्याचे सामूहिक श्रेय घेतले जाते, परंतु पराभवाचा धनी एकटाच असतो; अशी खंत बोलून दाखविली. जिल्ह्यातच नव्हे तर देशपातळीवरच पक्षासाठी कठीण काळ असल्याने आपापसातील मतभेद ठराविक पातळीवरच मिटविण्यात यावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी मंत्री विनायकदादा पाटील, डॉ. शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल आहेर, शरद आहेर, संपत सकाळे, प्रभारी डी. जी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यास माजी आमदार नाना बोरस्ते, प्रताप वाघ, निर्मला खर्डे, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे, हेमलता पाटील, स्वप्नील पाटील, सुनील आव्हाड यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.