नाशिक : कळवण तालुक्यातील काही गावांना सातत्याने बसणा-या धक्क्यामुळे गावातील हजारो नागरिक अद्यापही दहशतीखाली वावरत असून, सध्या थंडीचे दिवस असूनही भूकंपाच्या भीतीने लोक रात्रीही घराबाहेर झोपू लागले आहेत. शासनाने सतत बसणा-या भूकंपाचे कारण शोधून उपाययोजना करावी तसेच या भागात भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी मागणी दहा गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जयश्री पवार या दोघांनीही पुढाकार घेऊन शासनाला पत्र दिले आहे. तसेच संबंधित सर्वच गावांमध्ये तातडीच्या ग्रामसभा होऊन त्यात उपरोक्त मागणीचे ठराव करण्यात आले आहेत. दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत असून, १९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के बसल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली होती. परंतु तेव्हढ्यापुरतेच ग्रामस्थांना आश्वासित केले गेले, उलट नागरिकांनी घाबरू नये व भूकंप झाल्यास काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केल्यानंतर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. गेल्या महिन्यात २ व ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री पुन्हा धक्के बसल्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. कारण दळवट परिसरात चणकापूर, धनोली, भेगू, भांडणे, बोरगाव आदी ठिकाणी लहान मोठी पाण्याचा साठा असलेली धरणे आहेत. पुण्यातील भूकंप तज्ज्ञांनी २००२ मध्ये भविष्यात दळवट परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्याचा अनुमान काढला होता. त्यामुळे शासनाने काहीकाळ दळवट भागात भूकंपमापक यंत्र बसविले होते, कालांतराने मात्र ते काढून नेण्यात आले. अजूनही अधूनमधून धक्के बसत असून, त्याची कोणतीही नोंद घेण्याची यंत्रे याठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना अंदाज बांधणे कठीण होते. त्यामुळे शासनाने या ठिकाणी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नितीन पवार व जयश्री पवार यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने वेरुळे, कोसुर्डे, भांडणे, करंभेळ, खडकवण, विरशेत, बापखेडा, तताणी, दळवट, लिंगामे, शिंगाशी या गावांनी ग्रामसभा घेऊन या भागात भूकंपमापन यंत्र बसविण्यात यावे, असे ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. प्रशासनानेही ग्रामस्थांच्या भावनेशी सहमती दर्शवित राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पत्र पाठवून उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
कळवण तालुक्यातील ‘त्या’ गावांमध्ये अद्याप भय कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:03 PM
दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे.
ठळक मुद्देभूकंपाचे धक्के : यंत्र बसविण्यासाठी राज्य सरकारला साकडे१९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के