त्र्यंबकेश्वर : पुढच्या वर्षी अवघ्या ८ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वर्षभरात करोडो भाविक येऊन जाणार आहेत. त्यांच्यासाठी व शहरातील नागरिकांच्या कायमस्वरूपी विकासासाठी सध्या शहरात विविध कामे सुरू आहेत. तथापि, या कामांमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एवढी गैरसोय सहन करूनही सर्व निमूटपणे सोसावे लागत आहे. कारण बोलणार कोण?शहरात सिंहस्थाची अनेक कामे चालू आहेत. त्यात भूमिगत जलवाहिन्या टाकणे, विद्युत तारा (भूमिगत), टेलिफोन लाइन ही सर्व कामे झाल्यानंतर नगरपालिकेतर्फे सीमेंट कॉँक्रिटीकरण, रस्त्याची कामे सुरू होतील. याशिवाय विद्युत पोल उभे करणे आणि ही सर्व कामे रस्त्यावर-रस्त्याच्या कडेला होत असल्याने स्थानिक रहिवाशांना मशीनचा खडखडाट, रस्तेच बंद झाल्याने जाण्या-येण्यास त्रास होत असतो. रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर ठेचा खात चालणे, ठेचकाळणे, कधी कधी साष्टांग दंडवत करण्याची वेळ येणे, आपली स्वत:ची वाहने घर एकीकडे, तर वाहने दुसरीकडे लावावी लागतात. त्यातही विजेची कामे सुरू असल्याने वीज केव्हाही खंडित होणे असे प्रकार वारंवार घडत असतात. शिवाय शौचालय बांधकाम, शेड बांधकाम, रस्त्यासाठी वाळूचे ट्रक, विटा वाहतूक, सिमेंट-खडी आदिंसाठी ट्रकच शहरातील वावर पर्यायाने सर्वत्र धूळ उडत असते. असे प्रकार घडत आहेत व यापुढेही कामे पूर्ण होईपर्यंत घडणार आहे. ही सर्व गैरसोय, होणारा त्रास सहन करूनही कोणाचीही ब्र काढण्याची हिंमत नाही. कारण सर्व कामे होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
गैरसोय होतेय... पण बोलणार कोण?
By admin | Published: October 09, 2014 1:06 AM