शहरात एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दुसरीकडे कायदासुव्यवस्थाही गुन्हेगारांकडून धोक्यात आणली जात आहे. कोयते नाचवीत गुंडांकडून सर्वसामान्यांना लक्ष्य केले जात आहे, तर कोठे महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणे समजले जाणारे दागिने ओरबाडून पलायन करण्याचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. किंबहुना ते थांबविण्यात पोलीस यंत्रणाही अपयशी ठरल्याची टीका शहराच्या विविध उपनगरांमधून होत आहे. गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता लहान विक्रेत्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याकडे वळविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मध्यरात्री सर्रासपणे गुंडांकडून कधी बोटी तर कधी चायनीज विक्रीच्या हातगाड्यांची ‘होळी’ केली जाते, तरीही पंचवटीतील रात्र गस्तीवरील पोलीस पथकांना त्याचा कुठलाही मागमूस लागत नाही, हे विशेष!
नाशिकरोड भागातील मालधक्क्यांवर गुंडांची टोळी सर्रासपणे व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या त्यांच्या टोळीतील एका साथीदाराला जामीन मिळविण्यासाठी दहा हजारांची खंडणी वसुलीचा प्रयत्न करण्यापर्यंत गुंडांची मजल जाते यावरून पोलिसांची गुन्हेगारी प्रवृत्तीवर असलेली पकड सैल होताना दिसत आहे. व्यावसायिकाने रक्कम देण्यास नकार दिल्याने थेट कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न गुंडाकडून केला गेला, सुदैवाने वार हातावर रोखण्यास यश आल्याने सोमानी यांचे प्राण वाचले. एकूणच शहर व परिसरातील उपनगरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांचा वचक मात्र संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.
--इन्फो--
सोनसाखळी चोरीची मालिका सुरूच
राजरोसपणे म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, अंबड, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतत सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असूनदेखील एकाही चोरट्याला अद्यापपर्यंत बेड्या ठोकण्यास या पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकाला यश आलेले नाही. बोकड तस्करांच्या टाेळीने शहराकडे मोर्चा वळविण्याचे धाडस करत अंबड पोलीस ठाणे हद्दीतून २१ बोकड हातोहात लंपास केल्याची घटना अलीकडे घडली. या गुन्ह्याचा छडा लावण्यासही पोलिसांना अजून यश आलेले नाही. शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलीस प्रशासन अपयशी होत असल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
---