नाशिक- महापालिकेतील मान्यताप्राप्त म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू असतानाच आता मुख्यालयात या संघटनेसाठी देण्यात आलेली केबीनचा ताबा घेण्यावरून शिंदे ठाकरे गटात फटाके वाजण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाच्या वतीने नियुक्त अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी शुक्रवारी (दि.२१) या केबीनचा ताबा घेतला. मात्र, त्यांच्यासह शंभर ते दीडशे जणांनी महापलिकेतील केबीनचा ताबा घेऊन कागदपत्रे गहाळ केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार या सेनेचा अध्यक्ष असलेल्याचा दावा करणारे माजी शिवसेना नगरसेवक आणि सध्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनीपोलीसात तक्रार केली आहे.
महापालिकेतील सुमारे अडीच हजार कामगार म्युनिसीपील कर्मचारी कामगार सेनेचे सभासद आहेत. शिवसेनेचे (उध्दव ठाकरेगट) उपनेते आणि माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घेालप हे या सेनेचे संस्थापक असून त्यांनीच प्रविण तिदमे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले हेाते. मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना महानगर प्रमुख पद देण्यात आले आहे. त्यामुळे घोलप यांनी त्यांची हकालपट्टी केली आणि ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.
शुक्रवारी (दि.२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाशिकमध्ये असतानाच या नुतन अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी अध्यक्षाच्या दालनाचा ताबा घेतला. त्यामुळे तिदमे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून सुधाकर बडगुजर यांच्यासह सुमारे दीडशे जणांनी आपल्या कार्यालयात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून कागदपत्रे गहाळ केल्याचे नमुद केले आहे. तसेच यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.